गांजाच्या लागवड आणि विक्रीला थायलंडमध्ये कायदेशीर मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थायलंडमध्ये आता गांजाच्या लागवडीला, विक्रीला, स्वतःजवळ बाळगण्याला आणि वैद्यकीय वापराला अधिकृत मान्यता मिळाली आहे. थायलंड सरकारने गुरुवारी हा निर्णय घेतला. त्यामुळे गांजला कायदेशीर मान्यता देणारा थायलंड हा पहिला आशियाई देश बनला आहे. असे असले तरीही थायलंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे अद्यापही गुन्हा आहे.

थायलंडच्या सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी शुक्रवारपासून 1 दशलक्ष गांजाच्या रोपांचे वाटप करण्याची योजना सुरु केली आहे. पॉट स्मोकरसाठी गांजा अधीकृत होणे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. त्यामुळे येत्या काळात थायलंड विड वंडरलँड बनण्याचा दावा करण्यात येत आहे. थायलंडला प्रामुख्याने गांजाच्या बाजारपेठेत अव्वल बनायचे आहे. येथे आधीच एक चांगला विकसित वैद्यकीय पर्यटन उद्योग आहे आणि त्याचे आदर्श आहे.

अंमली पदार्थांच्या श्रेणीतून गांजा ही वनस्पती काढून टाकण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयामुळे वैद्यकीय आणि औद्योगिक वापरासाठी गांजा बाळगता येऊ शकतो. उरुग्वे आणि कॅनडा या दोन देशांनी आजवर गांजाला कायदेशीर मान्यता दिली आहे.

हा निर्णय झाल्यानंतर थायलंड मधील काही वकिलांनी गुरुवारी एका कॅफेमध्ये गांजा विकत घेऊन उत्सव साजरा केला. थायलंडचे उष्णकटिबंधीय हवामान भांग पिकवण्यासाठी चांगले आहे. या निर्णयामुळे आता गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला नफा मिळणार आहे. तसेच रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे.

मात्र या निर्णयावर काही नागरिक नाराज देखील आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गांजा अधिकृत केल्याने धोके वाढले आहेत. गांजाला यापुढे अंमली पदार्थ मानले जाणार नसल्याने त्याचा वापर अनियंत्रितपणे होऊ शकतो. गांजा वापरावर मर्यादा आणणारे मंत्रालयाचे कोणतेही नियम नाहीत. मतदारांना खूश करण्यासाठी आपले धोरण घाईघाईने राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही सरकारची चूक ठरू शकते. यासाठी नियोजन जनजागृती गरजेची आहे.