ठाण्याचा इलाका हमारा और धमाका भी हमारा ही होगा, आदित्य ठाकरे यांचे मिंधेना आव्हान

ठाणे हा मिंधेंचा बालेकिल्ला नाही. ठाण्याचा इलाका भी हमारा और धमाका भी हमारा ही होगा. त्याच ठाण्यातून मी सांगतोय की अलिबाबा आणि चाळीस चोरांना लोकसभा, विधानसभेची काय तर पालिकेची पायरीही आपण चढू द्यायची नाही, असं आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधेंना दिलं.

चंदनवाडी येथे झालेल्या सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसैनिक म्हटल्यावर जी ताकद, जिद्द आहे, ती सगळीकडे दिसतेय. हे 2024चं वर्षं आपलं आहे, त्यामुळे आपण पुन्हा एकदा ठाणे जिंकणारच. ठाणे आणि शिवसेना हे नातं कुणी बदलू शकत नाही. शिवसेना म्हणजे आपणच, मिंधे हे शिवसेना नव्हे. त्यांनी 2010मध्येही गद्दारी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांना नो सांगितलं होतं. पण जेव्हा आपल्यातून फुटले त्यानंतर मी पाहतोय. एकतर आधीच त्यांनी महाराष्ट्रातले उद्योग पळवले, त्यामुळे राज्यातल्या लाख तरुणांना मिळू शकणाऱ्या नोकऱ्या गेल्या. एकीकडे नोकऱ्यांची संधी नाही. दुसरीकडे सरकारी नोकरीसाठी निघालेली भरती पेपरफुटी झाल्याने होत नाही. अनेक वर्षं अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवण्याची स्वप्न चिरडली जातात. तरुणांची स्वप्न चिरडण्याचं काम मिंधे सरकार करत आहे. दुर्भाग्य हे पेपरफुटीचे आरोपी जामिनावर बाहेर येतात आणि पुढच्या वर्षीचे पेपर फोडण्यासाठी तयार होतात. मी आज तुम्हाला वचन देतो की आपलं सरकार येणार म्हणजे येणार. आणि सरकार आल्यानंतर नोकरभरतीचे पेपर जे फोडतात, त्यासाठी देशातल्या कडक कायद्यापेक्षा कडक कायदा करू पण तरुणांची स्वप्न चिरडणाऱ्याला चिरडल्याशिवाय राहणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी ठणकावलं.

‘आपल्या सरकारमध्ये लोकांची खूप मदत करण्यात आली. कारण आपल सरकार हे महिलांचं सरकार होतं, शेतकऱ्यांचं, तरुणांचं, गरिबांचं, वंचितांचं सरकार होतं. कोणावरही अन्याय होता कामा नये याची काळजी घेत होतो. पण, आजचं सरकार हे भ्रष्ट लोकांचं सरकार आहे. गुंडांचं, चिंधीचोरांचं, काँट्रॅक्टरांचं सरकार झालं आहे. आज हे खोके सरकार बिल्डरांचं सरकार झालं आहे. पण, तुमचं आमचं सरकार होऊ शकलेलं नाही. हे सरकारमध्ये घटनाबाह्य अवकाळी मुख्यमंत्री बसले आहेत, त्यांना मी आठवण करून द्यायला आलो आहे. तुम्ही महाराष्ट्राची खुर्ची काबीज केली आहे. तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री नाही आहात, या महाराष्ट्राची सेवा करा. दक्षिण भारताचे, पंजाब, बंगाल किंवा लडाखमधील लोक न्यायहक्कासाठी भांडत आहेत. पण आपले मुख्यमंत्री दिल्ली दिसलं की लोटांगण घालतात. त्यांना महाराष्ट्राशी काहीही देणघेणं नाही.’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

‘आज भाजप आणि मिंधे डॉ. आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायला निघाले आहेत. त्यांच्याविरुद्ध तुम्ही लढत आहात, तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. मी आज बातम्यांमध्ये पाहिलं, मिंधेंचा बालेकिल्ला म्हणून उल्लेख होता. हा मिंधेंचा बालेकिल्ला नाही. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा ही. त्याच ठाण्यातून मी सांगतोय की अलिबाबा आणि चाळीस चोरांना लोकसभा, विधानसभेची काय तर पालिकेची पायरीही आपण चढू द्यायची नाही. चाळीस चोरांना जनतेत फिरू द्यायचं नाही. जनतेने ठरवलंय की सामान्य जनतेला छळणाऱ्या, खोटारड्या, रडक्या लोकांना जागा देणार नाही हा निर्धार करायचा आहे, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मिंधेंना यावेळी दिलं.