झटपट तपासणी, चाचणी, निदान, उपचार; ठाण्यात आजपासून ‘मिशन झिरो’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबई, पुण्याच्या धर्तीवर ठाणे महापालिका उद्या सोमवारपासून मिशन झिरो’ हे अभियान सुरू करणार आहे. या मोहिमेतंर्गत प्रत्येक प्रभागामध्ये मोबाईल डिस्पेन्सरी तैनात करण्यात येणार आहे. डॉक्टर, नर्सेस आणि पॅरामेडीकल कर्मचारी असलेली ही मोबाईल डिस्पेन्सरी प्रभागातील कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉटमध्ये फिरणार असून तेथील रहिवाशांची तपासणी करणार आहे. या डिस्पेन्सरीच्या माध्यमातून कोविड संशयितांना शोधून झटपट चाचणी, निदान, उपचार करणे सोपे जाणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही चेस द व्हायरस हे अभियान राबवण्याच्या सुचना पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार भारतीय जैन संघटनेच्या मदतीने ठाणे महापालिकेने शहरामध्ये ‘झिरो मिशन’ सुरू करणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन उद्या सोमवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. झिरो मिशन अंतर्गत पालिका क्षेत्रातील 9 प्रभागांमध्ये एकूण नऊ मोबाईल डिस्पेन्सरी तैनात करण्यात येणार आहेत.

डॉक्टरसह सर्व आवश्यक कर्मचाऱयांचे पथक औषध साठयांसह प्रभागातील कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉटसह परिसरातील नागरीकांची तपासणी करणार आहे.एखादा संशयित रुग्ण सापडल्यास त्याची स्वॅब तपासणी करून लवकरात लवकर अहवाल देण्याचा प्रयत्न असणार आहे.
रिपोर्ट आल्यावर आवश्यकतेनुसार क्वारंटाईन किंवा हॉस्पिटलमध्ये रुग्णाची रवानगीही हे पथक करणार आहे.
या मोहिमेमुळे नागरीकांना स्वॅब तपासणीसाठी लॅबमध्ये जाण्याची गरज भासणार नसून वेळीच उपचार मिळाल्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबवणे शक्य होणार आहे.