
सिलिंडर लिकेज होऊन उडालेल्या आगीच्या भडक्यात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ठाण्यातील दिवा साबे गाव येथे घडली आहे. प्रेरणा लांबे आणि शांतीलाल सोलंकी अशी जखमींची नावे आहेत. हे दोघे 100 टक्के भाजल्याने त्यांना उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.
दिवा साबेगाव येथील विठ्ठल मंदिराजवळ सीताबाई निवास ही इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील रूम नंबर 402 मध्ये आज रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास सिलिंडर लिकेज झाल्याने भडका उडून आग लागली. शेजाऱ्यांच्या घरात गॅसचा वास येतो म्हणून दरवाजा उघडण्यासाठी प्रेरणा लांबे आणि शांतीलाल सोलंकी हे गेले असताना गॅसचा भडका उडाला आणि त्यात हे दोघे होरपळले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवले.






























































