ठाणे फायरब्रिगेडचा ‘फोर इन वन’ फॉर्म्युला – वेळ, मनुष्यबळ, पाण्याची होणार बचत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

आग विझवणाऱ्या पाइपची देखभाल, दुरुस्ती आता नियमितपणे व वेगात होणार आहे. पाइपचे क्लिनिंग, वॉशिंग, ड्राइंग व रोलिंग एका फटक्यात होणार असून त्यासाठी ठाणे फायरब्रिगेड ‘फोर इन वन फॉर्म्युला’ वापरणार आहे. या चारही गोष्टी मशीनद्वारे होणार असून त्यासाठी महापालिका लवकरच परदेशी बनावटीचे होजकेअर मशीन विकत घेणार आहे. त्याकरिता 3 कोटी 77 लाख रुपये एवढा खर्च येईल. होजकेअर मशीनद्वारे आग विझवणाऱ्या पाइपची देखभाल होणार असल्याने वेळ, मनुष्यबळ तसेच पाण्याचीदेखील बचत होणार आहे. या मशीनमुळे ठाणे फायरब्रिगेड खऱया अर्थाने हायटेक बनणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात जव्हारबाग, कोपरी, पाचपाखाडी, वागळे, बाळकुम व मुंब्रा ही सहा अग्निशमनदल केंद्रे आहेत. 20 लाखांहून अधिक ठाण्याची लोकसंख्या झाल्याने अग्निशमनदल केंद्रेही सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून होजकेअर मशीन विकत घेतली जाणार आहे. अनेकदा अग्निशमनदलाचे जवान अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आग विझवण्याचे काम करतात. ते करीत असताना पाइपात माती जाणे, ऑइलमुळे खराब होणे, पंक्चर होणे असे प्रकार होतात. त्यामुळे पाइपचे आयुष्य कमी होते. 50 फूट पाइपची किंमत 10 हजार रुपये एवढी आहे.

अग्निशमन दलाचे पाइप साफ करण्यासाठी वरच्यावर पाण्याचा मारा करून धुतले जातात, पण त्याची सफाई पूर्णपणे होत नाही. या नव्या मशीनमुळे पाइपची स्वच्छता, पाइप सुकवणे व त्याचे रोलिंग करणे अशी अनेक कामे होजकेअर मशीनद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याचीदेखील मोठी बचत होणार आहे. या मशीनमुळे आग विझवणाऱ्या पाइपची देखभाल ही अतिशय व्यवस्थित होणार असल्याने आग विझवताना जवानांना कोणताही त्रास होणार नाही. ही मशीन हाताळण्याचे प्रशिक्षणही अग्निशमनच्या जवानांना दिले जाणार आहे.

‘एनओसी’ देताना होज पाइपची चाचणी करणार

ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक उंच टॉवर्स असून या इमारतींना महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत ना हरकत दाखला दिला जातो. आता संबंधित इमारतीच्या अग्निशमन यंत्रणेची तपासणी अतिशय कडक केली जाणार आहे. विशेषतः आग विझवणारा होज पाइप व अन्य तांत्रिक बाबींची तपासणी होज पाइप मशीनद्वारे करण्यात येणार आहे.