
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेट ट्रेनच्या स्वप्नाला आज ठाण्यात पहिला झटका बसला आहे. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल चार वेळा मंजुरीसाठी आणण्यात आलेला बुलेट ट्रेनसाठी जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव अखेर बासनात गुंडाळण्यात आला. प्रशासनाचा प्रस्ताव दप्तरी दाखल केल्याची घोषणा महापौर नरेश म्हस्के यांनी महासभेत केली. त्यामुळे ठाण्यात बुलेट ट्रेनला करकचून ब्रेक लागला आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील तब्बल 60 टक्के तर गुजरातमधील अवघी 40 टक्के जमीन या प्रकल्पासाठी लागणार आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जमीन संपादन करण्याकरिता जोर लावला होता. खासगी जमिनीच्या संपादनासाठी प्रतिहेक्टर 9 कोटी रुपये इतका मोबदला निश्चित करण्यात आला.
ठाणे महापालिका क्षेत्रातील शिळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावांमधून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) माध्यमातून प्रकल्पाकरिता जागा हस्तांतरणाची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.
शिळ भागातील 3 हजार 849 चौ.मी. इतकी जागा या प्रकल्पामुळे बाधित होणार आहे. ही जागा बुलेट ट्रेनसाठी देण्याची मागणी एनएचएसआरसीएलने गेल्या वर्षी केली होती. या जागेच्या बदल्यात 6 कोटी 92 लाख 82 हजार रुपये मोबदला देण्याची तयारीही त्यांनी दाखवली. त्यानुसार मोबदला देऊन ही जागा एनएचएसआरसीएलच्या नावे करण्याचे प्रस्ताव प्रशासनाने वर्षभरापूर्वी तयार केला होता.
बुलेट ट्रेनच्या भूसंपादनाचा प्रस्ताव या आधी तीन वेळा महासभेत मांडण्यात आला होता. तो पुन्हा चौथ्यांदा मंजुरीसाठी महासभेच्या विषय पटलावर ठेवण्यात आला होता. त्यात भाजपचे अनेक नगरसेवक पहिल्यांदाच्या महासभेला हजर राहिल्याने प्रस्तावाचे काय होणार याची चर्चा होती. आज हा प्रस्ताव मंजुरीसाठी येताच भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी हा प्रस्ताव वारंवार मंजुरीसाठी का आणला जात आहे, असा सवाल केला. त्यांना भाजपचे इतर नगरसेवक साथ देतील, असे वाटत असतानाच त्यांनी यावर कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे महापौर नरेश म्हस्के यांनी तत्काळ हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

































































