
आजतागायत स्वतःचे डम्पिंग ग्राऊंड निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या ठाणे महापालिकेचा एक नवीन कारनामा समोर आला आहे. घनकचरा व्यवस्थापन करण्याच्या मूळ हेतूलाच पालिका प्रशासनाने हरताळ फासला असून दिव्यात डम्पिंगच्या नावाखाली कचऱ्याच्या ढिगाखाली खारफुटीच गाडली आहे. पर्यावरणाची अतोनात हानी केल्याची गंभीर दखल राष्ट्रीय हरित लवादाने घेत पालिकेला खडे बोल सुनावले आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली नसल्याने लवादाच्या निर्देशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने बडगा उगारत ठाणे पालिकेला तब्बल 10 लाखाचा दंड ठोठावला आहे.
ठाणे महापालिकेला एवढ्या वर्षात स्वतःचे हक्काचे डम्पिंग ग्राऊंड निर्माण करता न आल्याने गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यात बेकायदा डम्पिंग तयार करून त्या ठिकाणी कचरा टाकण्यात येत होता. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयामध्ये 2016 ते 2023 पर्यंत खारफुटी नष्ट केल्याने हरित लवादानेदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 2023 साली वनशक्ती फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने पालिकेच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती. तसेच खाडी परिसरातील ठाण्यातील दिवा भागातील खाडीकिनारी टाकल्याबद्दल 10 कोटींचा दंड ठोठावला आहे. तसेच
बेकायदेशीर कचरा टाकून चक्क खारफुटी नष्ट झाल्याचा दावा करण्यात आला होता.
गेल्या सात वर्षांपासून बेकायदेशीर कचरा टाकण्यात येत होता. त्यामुळे खारफुटीचे मोठे नुकसान, दुर्गंधी, प्रदूषण, नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. आम्ही सुरुवातीपासूनच या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत होतो. आजची ही कारवाई म्हणजे दिव्यातील जनतेचा विजय असून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लढ्याला यश आले आहे. – रोहिदास मुंडे, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख
राष्ट्रीय हरित लवादाकडे ठाणे पालिकेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे. ज्यामध्ये दिवा डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी महापालिकेच्या वतीने 80 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. यासंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. – मनीष जोशी, उपायुक्त घनकचरा