
गेल्या आठवड्यात पोखरण रोड, त्यानंतर श्रीनगरमध्ये बिबट्याचे दर्शन झाले असतानाच आज चक्क वागळे इस्टेटमधील वारली पाडा या गजबजलेल्या वस्तीत बिबट्याने कुत्र्यावर झडप घालत त्याला ओढून नेल्याची घटना घडली. एका रहिवाशाने हा थरार व्हिडीओत कैद केला. बिबट्या आता ठाण्याच्या मध्यवर्ती वस्तीत खुलेआम घुसून हल्ले करू लागल्याने ठाणेकरांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
२५ डिसेंबरला पोखरण रोड परिसरात बिबट्याने दर्शन दिले. त्यानंतर २६ डिसेंबर रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास श्रीनगरजवळील वारली पाड्यातील गल्लीबोळात बिबट्या शिकारीच्या शोधात फिरत असल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला होता. या बिबट्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. मात्र बिबट्या या पथकाच्या हाती लागला नाही. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री या बिबट्याने वारली पाडा परिसरात एका कुत्र्यावर झडप घातली. या घटनेचा व्हिडीओ एका स्थानिकाने मोबाईलकॅमेऱ्यात कैद केली आहे.
वनविभागाचे शोधकार्य सुरू
गेल्या महिन्यात मीरा-भाईंदर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत अनेक नागरिकांवर हल्ला केल्याची घटना ताजी आहे. ठाण्यातही अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी वनविभागाने बिबट्याचा शोध सुरू केला आहे. यावेळी वागळेसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पथकाने दिला आहे. तसेच लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका, एकट्याने फिरू नका, हातात काठी ठेवा असे आवाहन वनविभागाने केला आहे.

























































