
ठाणेकर नागरिकांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे करण्यात आली. मात्र या स्मार्ट सिटीची वाट लागली आहे. कोपरी वॉटर फ्रंटचे तर तीनतेरा वाजले असून ठाणे ही स्मार्ट सिटी की भ्रष्टाचार सिटी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. कोपरीतील अॅम्पी थिएटरला तडे गेले असून आसनांची मोडतोड झाली आहे. ऐतिहासिक तोफांचे चौथरेही उखडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
ठाणे शहरात विविध ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मोठा गाजावाजा करून कामे केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरीमध्येच या कामांचा पर्दाफाश झाला आहे. अवघ्या अडीच वर्षांमध्येच कोपरी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटची पुरती वाट लागली आहे. हा प्रकल्प मोडकळीस आला असून आम्हाला त्याचा उपयोग तरी काय, असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये ही परिस्थिती असेल तर अन्य ठिकाणचे काय, असाही सवाल ठाणेकर
विचारत आहेत.
स्मार्ट सिटी योजनेखाली कोपरीमध्ये अॅम्पी थिएटर उभारले. त्याचप्रमाणे उद्यान, वाहनतळ, जेट्टीच्या रस्त्याचे नूतनीकरण, प्रसाधनगृह या सुविधादेखील निर्माण केल्या, पण प्रत्यक्षात अॅम्पी थिएटरच्या भिंतीलाच तडे गेल्याचे दिसून आले आहे. बाकड्यांची मोडतोड झाली असून तोफांचा चौथरा उखडलेल्या अवस्थेत आहे. दरम्यान, निकृष्ट दर्जेचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून या दुर्दशेस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
‘त्या’ चौकशीचे काय झाले?
ठाण्यातील स्मार्ट सिटीच्या कामावर यापूर्वीदेखील अनेक गंभीर आरोप झाले होते. तत्कालीन केंद्रीय नागरी विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी त्याची दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले, पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. दरम्यान, ठाणेकरांच्या पैशांची ही उधळपट्टी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केली आहे.