
सामना प्रतिनिधी। ठाणे
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असतानाच ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुमारे 800 कोटींची विकासकामे रोखून धरली आहेत. शुक्रवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाचे तीन प्रस्ताव तहकूब ठेवल्याने आयुक्त कमालीचे संतप्त झाले असून त्याचा बदला म्हणून प्रस्तावित विकासकामे न करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर मंजूर झालेल्या कामांच्याही वर्कऑर्डर देऊ नका, असे आदेशच खातेप्रमुखांना दिल्याने महापालिकेत प्रशासनाविरोधात नगरसेवक असे चित्र निर्माण झाले आहे.
शुक्रवारी झालेली महासभा कमालीची वादग्रस्त ठरली. या महासभेत प्रशासनाच्या वतीने काही प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. मात्र त्यांना नगरसेवकांनी विरोध केला. आरएफआयडी, टेबल टू टेबल फाईलचा शोध घेणारे टॅब तसेच 60 कोटी रुपयांचे ई गव्हर्नन्स असे तीन प्रस्ताव सर्वसाधारण सभेने तहकूब केले. तसेच महापालिकेतील तंत्रज्ञान अपडेट करण्यासाठी मांडलेल्या प्रस्तावात पुरेशी माहिती नसल्याचे सांगत हा प्रस्तावही तहकूब ठेवण्यात आला.
प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावांवर नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेऊन आक्षेप नोंदवले. तसेच सखोल माहिती देऊन हे प्रस्ताव पुन्हा महासभेपुढे आणावेत अशी सूचना केली. आज आयुक्तांनी तातडीने पालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत वर्कऑर्डर, दिलेली कामे थांबवा असे आदेश दिले. यूटीडब्ल्यूटी रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे यांसह महत्त्वाची विकासकामे आयुक्तांच्या आदेशामुळे रखडणार आहेत.
फसवणूक होऊ नये म्हणूनच…
महासभेत प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावांबाबत नगरसेवकांनी काही शंका निर्माण केल्या असतील तर त्या दूर करणे हे संबंधित अधिकाऱयांचे काम आहे. पालिकेचे पैसे वाचावेत तसेच फसवणूक होऊ नये या चांगल्या भावनेनेच काही प्रस्ताव तहकूब केले. मात्र त्याच्या बदल्यात विकासकामे रोखून ठाणेकरांना कुणीही वेठीस धरू नये. – मीनाक्षी शिंदे, (महापौर).
… तर ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार
प्रशासनाच्या प्रस्तावांना कुणी विरोध केला याची माहिती आयुक्त जयस्वाल सध्या घेत असून अशा नगरसेवकांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाण्याची शक्यता आहे. माझ्या परवानगीशिवाय कोणतीही कामे करू नका, असे आदेशच त्यांनी अधिकाऱयांच्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला आहे.

































































