
संथ गतीने सुरू असलेल्या वडाळा-कासारवडवली मेट्रो स्थानकाच्या छताचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे माजिवडा उड्डाणपुलावरून नाशिक आणि घोडबंदर रोडकडे जाणारी वाहतूक 28 ते 31 मे या कालावधीत रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत पुलाखालील मार्गावरून वळविण्यात येणार आहे. दरम्यान, नाशिक आणि घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीचा परिणाम होणार आहे.
महामार्गावरील ज्युपिटर रुग्णालयाजवळ मेट्रो स्थानकाचे काम सुरू असून त्यावर छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत. या कामादरम्यान जॅक बीम टाकून त्यावर राफ्टर उभारले जाईल. हे काम 60 टन असलेल्या क्रेनच्या सहाय्याने होणार आहे. रात्री 10 वाजता भलीमोठी क्रेन उभी करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याने या पुलावरून घोडबंदर रोड व नाशिककडे जाणाऱ्या सर्वच वाहनांना बंदी घालण्यात आली असल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली आहे.
हा आहे पर्यायी मार्ग
मुंबईकडून नाशिक व घोडबंदर रोडकडे जाणारी वाहने माजिवडा उड्डाणपुलावर न जाता पुलाखालून कापूरबावडी सर्कल येथील इच्छितस्थळी जातील.