शिवसेनेमुळे ठाण्यात वारकऱ्यांना मिळाले हक्काचे भवन, आषाढी एकादशीदिनी वास्तूचा ताबा मिळाला

ठाणे महापालिकेने उभारलेल्या वारकरी भवनाचा ताबा घेण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्न करणाऱया वारकऱयांना अखेर माऊली आषाढी एकादशीदिनी पावली. शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे वारकऱयांना त्यांच्या हक्काच्या वारकरी भवनाचा ताबा आज मिळाला. त्यानंतर असंख्य वारकऱयांनी ‘राम कृष्ण हरी… माऊली माऊली’चा गजर करीत टाळमृदुंगाच्या गजराने वारकरी भवनाचा परिसर दणाणून सोडला.

ठाण्यात वारकरी भवन उभे राहावे यासाठी खासदार राजन विचारे हे नगरसेवक असताना त्यांनी पाठपुरावा करून महापालिकेच्या माध्यमातून नौपाडय़ातील राम मारुती रोडवरील संत गजानन महाराज चौकात वारकरी भवन उभारले. या कामाचे भूमिपूजन 2007 मध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तयार झालेल्या इमारतीचे लोकार्पण 19 डिसेंबर 2011 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु शहर विकास विभागाकडे या वारकरी भवनाचा ताबा न मिळाल्याने इमारत विनावापर पडून राहिली.

या वारकरी भवनाचे उद्घाटन नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे यांच्यासह उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृहनेते अशोक वैती, गटनेते दिलीप बारटक्के, परिवहन सभापती विलास जोशी, ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक मीनाक्षी शिंदे, वंदना डोंगरे, स्मिता इंदुलकर, श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाचंगे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा आसावरी फडणीस, उपाध्यक्ष प्रकाश दिघे, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह नरेंद्र बेडेकर, वारकरी संप्रदायातील माऊली सेवा मंडळ ठाणे व विश्व वारकरी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष विलास फापाळे यांच्यासह असंख्य वारकरी, शिवसैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या