ठसा – बच्चू पांडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीकांत आंब्रे

‘मेंदीच्या पानावर’ या वाद्यवृंदाचे निवेदन असो की त्या कॅसेट संग्रहातील गाण्यांचे, ‘बच्चू पांडे यांचा त्यांच्या खास शैलीतील आवाज कानावर पडला की सादर होणाऱया गाण्याला उठाव यायचा. त्या त्या गाण्यातील नेमका भाव उलगडताना त्यांच्या निवेदनातील उतार-चढाव श्रोत्यांना कानात साठवून घ्यावेसे वाटायचे. त्यांच्या निवेदनात ओढून ताणून आणलेली कृत्रिमता अजिबात नव्हती. त्यांची निवेदनाची, संवादफेकीची स्वतंत्र आणि सहजसुंदर शैली गाण्याइतकीच श्रोत्यांना भारून टाकायची. त्या गाण्याचे सौंदर्य द्विगुणीत करायची. आज बच्चू पांडे आपल्यात नाहीत. नव्या पिढीने त्यांचे ‘मेंदीच्या पानावर’ वा लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या ‘नटरंगी नार’ या कार्यक्रमाचे निवेदन कदाचित ऐकले नसेल त्यांना बच्चू यांच्या निवेदनाच्या मोहिनीचा प्रत्यय आला नसेल. निवेदनातून एकीकडे गाण्याशी आणि त्याचवेळी श्रोत्यांशी सुसंवाद साधणाऱया त्यांच्या निवेदनात जबरदस्त आत्मविश्वास, शब्दातील अभ्यास आणि ओघवत्या शैलीचा प्रसन्न प्रवाह रसिकांना एक वेगळाच आनंद देत असे. मुळात बच्चू हे हाडाचे कलावंत होते. स्पर्धेतील एकांकिकांच्या दिग्दर्शनापासून मराठी वाद्यवृंदांच्या निवेदनापर्यंत जवळजवळ तीस-पस्तीस वर्षांचा त्यांचा रंगभूमीवरचा प्रवास म्हणजे त्यांच्या कलागुणांचा परिपाक होता. प्रेक्षक ग्रामीण असो वा शहरी, रसिकांची नेमकी नाडी ओळखण्याची त्यांची कला त्यांच्या निवेदनातून दिसत असे. कार्यक्रम कोणताही असो, त्यात पूर्णपणे झोपून देण्याची त्यांची वृत्ती शेवटपर्यंत कायम होती. भावगीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, भजन, लोकसंगीत, नाटय़गीते, शृंगारिक लावण्या आदी गीत प्रकारांचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. ते स्वतः कवी होते. सुंदर हस्ताक्षरातील त्यांची कवितांची वही ज्यांनी चाळली असेल त्यांना त्यांच्या हळव्या कविमनाचा प्रत्ययही आला असेल. सूर, लय, ताल, भाव, शब्द यांचे पुरेपूर भान त्याच्ंया निवेदनातून दिसत असे. निवेदनातून श्रोत्यांशी जवळीक साधणे, स्पष्ट शब्दोच्चारातून सुसंवादी वातावरण तयार करणे या गोष्टी निवेदकासाठी आवश्यक आहेत ही त्यांची धारणा

डोंबिवलीकर असल्याचा सार्थ अभिमान बाळगणाऱया बच्चू पांडे यांनी डोंबिवलीतील आपल्या कलावंत मित्रमंडळींसोबत ‘अष्टगंध’ संस्था आकारास आणली. गायक प्रभंजन मराठे, उदय चितळे, वासुदेव बापट, श्वेतकीर्ति मराठे, विनोद जोशी आदी संगीतप्रेमींनी ‘मेंदीच्या पानावर’ हा मराठमोळा वाद्यवृंद ‘अष्टगंध’तर्फे महाराष्ट्रभर नेला. दोन हजारांच्या वर त्याचे प्रयोग झाले. ‘मेंदीच्या पानावर’ आणि बच्चू पांडे हे एक समीकरणच तयार झाले. ‘मेंदीच्या पानावर’ हे शीर्षकही त्यांचेच. त्यावेळी एकांकिका स्पर्धांच्या बहरलेल्या काळात त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनयाची पारितोषिकेही पटकावली. ‘यंग पार्टनर’ या व्यावसायिक नाटकाचे दिग्दर्शनही केले. मराठी कलाकारांना सोबत घेऊन ‘मेंदी रंग लाग्यो’ या गुजराती वाद्यवृंदाची निर्मिती त्यांनी केली. त्यातील दीडशे प्रयोगांपैकी पस्तीस प्रयोग त्यांनी अमेरिकेत अडीच महिने राहून तिथे केले. ‘नटरंगी नार’ या सुरेखा पुणेकरांच्या लावणी कार्यक्रमातील त्यांचे लावणीच्या इतिहासापासून प्रत्येक लावणीची वैशिष्टय़े सांगणारे कल्पक निवेदन गाजले आणि ‘नटरंगी नार’ही गाजली. बच्चू यांचे खरे नाव विनायक होते. त्यांच्या निधनाने उत्तम निवेदकांच्या पंक्तीतला एक दुवा अकाली निखळला आहे. ‘मराठी रसिकहो…’ ही त्यांची प्रेमळ हाक आता ऐकू येणार नाही.