
सामना ऑनलाईन । हैदराबाद
हैदराबादमधील तब्बल 400 वर्षे जुन्या चारमिनारचा काही भाग दुरुस्ती करताना बुधवारी रात्री कोसळला. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. हा भाग कोसळण्याचे नेमके कारण कळू शकलेले नाही. मात्र ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी स्थानिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्व परिसर रिकामा केला. दरम्यान, या भागात अनेक दुकानेही आहेत.
चारमिनार पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येत असतात. यापूर्वीही या इमारतीचा आणखी एक भाग कोसळला असून चारमिनारच्या इमारती खचल्या आहेत का ? किंवा धोकादायक झाल्या आहेत का याबाबतचे कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे हिंदुस्थानी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, इमारतीचा कोसळलेला भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला असून आता त्या ठिकाणी तसाच भाग तयार करणे कठीण आहे. त्यामुळे इमारतीचे सौंदर्य कमी झाल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
2010च्या पुरातही कोसळला होता एक भाग
- ऑगस्ट 2010 मध्ये हैदराबादमध्ये आलेल्या महापुरात चारमिनारचा एक भाग कोसळला होता. हे लक्षात घेता शहरात मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या पावसामुळे इमारतींचे नुकसान होत असावे, असा निष्कर्षही अधिकाऱयांनी काढला आहे.
- 16व्या शतकात म्हणजेच 1591मध्ये कुतूब शहाच्या साम्राज्यातील पाचवा शासक सुल्तान मोहम्मद कुली कुतूब शहा याने चारमिनार बांधला होता. चारमिनारची उंची 160 फूट (48.7 मीटर) इतकी आहे.


























































