
दिल्लीतील वजिराबाद येथील रहिवासी असलेल्या दोन भावांच्या जीवनावरील माहितीपट ‘ऑल दॅट ब्रिद्स’ कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट ठरला आहे. माहितीपटाने गोल्डन आय पुरस्कारावर नाव कोरले आहे. यानिमित्ताने हजारो पक्ष्यांना वाचवणारे नदीम शहजाद आणि मोहम्मद सैद यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दिग्दर्शक शौनक सेन दिग्दर्शित ‘ऑल दॅट ब्रिद्स’ माहितीपटाने ‘सनडान्स’ चित्रपट महोत्सवामध्ये ‘ग्रॅन्ड ज्युरी’ पुरस्कार पटकावला होता. आता या कलाकृतीने 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवात शनिवारी सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या पुरस्कारावर नाव कोरले. सध्याच्या विनाशकारी जगात प्रत्येक जीव आणि प्रत्येक लहान कृती महत्त्वाची आहे, याचे स्मरण करून देणारा हा माहितीपट आहे, असे पुरस्काराच्या निवड समितीवरील सदस्यांनी म्हटले आहे.
‘ऑल दॅट ब्रिद्स’ या 90 मिनिटांच्या माहितीपटात दिल्लीतील वायूप्रदूषणाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. महम्मद सैद आणि नदीम शेहजाद या भावंडांभोवती कथा फिरते. ते दोघे जण प्रदूषित हवामानात पक्ष्यांना, विशेषतः घारींना वाचवण्याचे आणि त्यांच्यावर उपचार करण्याचे कार्य करतात.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिग्दर्शक निर्माते शौनक सेन यांचे एलोडिओ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. यामुळे अन्य माहितीपट निर्मात्यांना प्रेरणा मिळेल, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.
19 वर्षांपूर्वी नदीम शहजाद आणि मोहम्मद सैद यांनी उत्तर दिल्लीतील वडिलोपार्जित घराजवळील रस्त्यावर गरुडाची सुटका केली होती. तेव्हापासून दोघा भावांनी मिळून 23 हजार पक्ष्यांवर उपचार केले आहेत. त्यामध्ये बहुतेक शिकारी पक्षी आहेत. त्यांच्यासाठी दोघांनी वजिराबाद येथे पक्ष्यांसाठी रेस्क्यू सेंटरही बांधले आहे. त्यांच्या घराच्या छतावर जवळपास 300 पक्षी येतात.
पक्ष्यांचे जीव वाचवण्याचे व्रत नदीम शहजाद आणि मोहम्मद सैद यांनी घेतले आहे. या कामात त्यांना निधीची चणचण जाणवत असतानाही त्यांनी हिंमत सोडली नाही. पक्ष्यांची काळजी घेणे, त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुन्हा उडायला मदत करणे, यातील त्यांचे बाँडिंग खूप सुंदररित्या ‘ऑल दॅट ब्रिद्स’ मध्ये दाखवले आहे.



























































