
सॅनिटरी नॅपकीन मशीनही तपासणीनंतरच बसवणार
खोटी कागदपत्रे सादर करून पालिकेच्या नालेसफाईचे कंत्राट मिळवणाऱया मैनदीप एंटरप्रायजेस कंत्राटदाराला पालिकेने आता कायमचे काळय़ा यादीत टाकले आहे. शिवाय सॅनिटरी नॅपकीन मशीन बसवण्याचा उपक्रम तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढे राबवण्यात येणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अॅड. अनिल परब यांनी आज पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली.
आमदार म्हणून अधिकार असताना पालिका आयुक्तांनी आमदार अॅड. अनिल परब यांना भेट नाकारली होती. शिवाय तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई यांनीदेखील विधान परिषदेत चुकीची माहिती सादर केली होती. त्यामुळे पालिका आयुक्त आणि संबंधित मंत्र्यांविरोधात अॅड. अनिल परब यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. या पार्श्वभूमीवर त्यांची आज पालिका आयुक्तांसोबत बैठक झाली. खोटी कागदपत्रे करणाऱया मैनदीप एंटरप्रायजेस पंपनीवर ‘एफआयआर’ नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱया पालिकेने आता ‘एफआयआर’ नोंदवून त्याला कायमस्वरूपी काळय़ा यादीत टाकल्याची माहिती दिल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पालिकेच्या सॅनिटरी नॅपकीन मशीन बसवण्याच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही परब यांनी केला होता.
‘त्या’ झोपडीधारकांना हक्काचे घर मिळणार
पालिकेच्या माहीम येथील उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणात 17 झोपडीधारकांवर चुकीच्या धोरणामुळे बेघर होण्याची वेळ आली होती. या झोपडीधारकांना बिल्डरच्या स्किमनुसार हक्काची घरे देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संबंधित सर्व 17 झोपडीधारकांना हक्काची घरे देण्यात येतील, असे आश्वासन पालिकेकडून देण्यात आल्याचे परब यांनी सांगितले.


























































