सावधान ! संकट अजून टळलेले नाही; मालिका वाचवण्याचे हिंदुस्थानपुढे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिसरा सामना जिंकून मालिका पराभव टाळणाऱया हिंदुस्थानसमोर असलेले संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे सावधान असलेल्या हिंदुस्थानने आता चौथा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे ध्येय समोर ठेवलेय तर यजमान वेस्ट इंडीज पुन्हा एखदा मालिका खिशात घालण्यासाठी सज्ज झाला आहे. कसोटी आणि वन डे मालिका गमावलेल्या विंडीजने या दौऱयाचा शेवट सुखद करण्याचे ध्येय उराशी बाळगल्यामुळे चौथ्या सामन्यात जोरदार चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानचा युवा संघासाठीही चौथा सामना मोठे आव्हान असून तिसऱया लढतीत केलेल्या जोरदार खेळाची पुनरावृत्ती करण्यासाठी शनिवारी नेमका कोणता प्रयोग केला जाणार आहे, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

विंडीज दौऱयाचे पहिले दोन टप्पे दिमाखदाररीत्या जिंकणाऱया हिंदुस्थानसाठी टी-20 चा तिसरा टप्पा भलताच आव्हानात्मक ठरला आहे. हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वात खेळणाऱया हिंदुस्थानची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. पहिल्या दोन टी-20 सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने मालिका वाचवण्याचे आव्हान हिंदुस्थान पुढे होते आणि यंग इंडियाने खणखणीत खेळय़ा करत ते आव्हान कायमही राखले. तिसऱया टी-20 सामन्यात विजय मिळवून हिंदुस्थानने मालिकेतील आपले आव्हान कायम राखले, मात्र अद्याप मालिका पराभवाचे संकट टळलेले नाही. तिसऱया सामन्यात सांघिक कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला. त्यामुळे उद्या होणाऱया सामन्यात हिंदुस्थानला विजय अनिवार्य असल्याने पुन्हा एकदा टीम इंडियाला सांघिक खेळाचे प्रदर्शन करावे लागणार आहे.

सलामीच्या जोडीकडून वेळोवेळी निराशा

आगामी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी संघात फेरबदल करण्यात येत आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत सलामीची जोडी ही हिंदुस्थानसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. पहिल्या तीनही टी-20 सामन्यांत हिंदुस्थानच्या सलामीच्या जोडीने निराशा केली आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेप्रमाणेच शुभमन गिलची बॅट टी-20 मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांतदेखील तळपलेली नाही, तर दुसरीकडे एकदिवसीय मालिकेत तिन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱया इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विंडीज दौऱयाला प्रयोगशाली करणारे संघव्यवस्थापन उद्या कोणता प्रयोग करते, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. पदार्पणात अपयशी ठरलेल्या यशस्वी जैसवालला पुन्हा संधी मिळते की इशान संघात परततो की संजू सॅमसनला विश्रांती दिली जाते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

तिलक, सूर्या फॉर्मात

पहिल्या तीन सामन्यांत तिलक वर्माची बॅट चांगलीच तळपली आहे. पहिल्या सामन्यात 22 चेंडूंत 39, दुसऱया सामन्यात 41 चेंडूंत 51 आणि तिसऱया सामन्यात 37 चेंडूंत नाबाद 49 धावांची खेळी करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया तिलक वर्माने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो पहिल्या तीन सामन्यांतच हिंदुस्थानसाठी वर्ल्ड कपसाठी मधल्या फळीचा दावेदार बनला आहे. दुसरीकडे पहिल्या दोन सामन्यांमध्ये विशेष कामगिरी करू न शकणाऱया सुर्यकुमार यादवने तिसऱया सामन्यात विंडीजच्या गोलंदाजांना अक्षरशः पह्डून काढले. त्यावरून तो तळपला आहे याची कल्पना आली आहे. त्यामुळे उद्या तिलक आणि सूर्याच्या खेळीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील हे स्पष्ट आहे.

शेवट गोड करण्याची संधी

हिंदुस्थानने वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत विजय मिळवून आपले वर्चस्व राखले, मात्र टी-20 मालिकेत हिंदुस्थानचे हे वर्चस्व मोडीत काढण्याची संधी वेस्ट इंडीजकडे आहे. पहिल्या दोन टी-20 सामन्यांत विजय मिळवल्याने वेस्ट इंडीज सध्या आघाडीवर आहे. उद्याच्या सामन्यात विजय मिळवून टी-20 मालिका विजयाचे स्वप्न साकार करण्यासाठी वेस्ट इंडीज मैदानात उतरणार आहे. टी-20 मालिका विजयासह हिंदुस्थानविरुद्धच्या दौऱयाचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न वेस्ट इंडीज करेल.