शिवडी – न्हावा सिलिंक मार्गावरील अतिक्रमित बांधकामे जमीनदोस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चिरनेर

नव्याने होत असलेल्या शिवडी न्हावा सिलिंक मार्गावरील जासई हद्दीत असणाऱ्या संपादित जमिनींवरील बांधकामांवर सिडकोच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करून ती बुधवारी जमीनदोस्त केली.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शिवडी न्हावा हा सागरी सेतूचा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने सुरू केला आहे. त्यासाठी जमीन संपादनाची प्रकिया पूर्ण केली आहे. सदर मार्ग शिवडी येथून सुरू होऊन सागरी सेतूने पनवेल तालुक्यातील न्हावे गावावरून चिर्ले येथे विस्तारीत होत आहे.

या मार्गात जासई ग्रामपंचायत हद्दीतील जेएनपिटी महामार्गाच्या जुन्या टोळ नाक्याजवलीळ रस्त्याच्या दोन्ही बाजूची मालसाठवणुकीची गोदामे, हॉटेल, गॅरेज अशी विविध बांधकामे येत असल्याने ती बांधकामे पाडून ती जागा या मार्गासाठी मोकळी करण्याचे लेखी निर्देश जागा मालकांना सिडकोने दिले होते. तरीही ती जागा मोकळी न केल्याने आज सिडकोच्या अतिक्रमण विभागाने मोठ्या पोलीस फौज फाट्यासह सदर बांधकामांवर धडक कारवाई करून ती जमिनदोस्त केली. सिलिंक मार्गासाठी ही जागा मोकळी झाल्याने या मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

ही कारवाई करण्याअगोदर येथील जागा मालकांना आम्ही सिडको मार्फत नोटीस बजावल्या होत्या. नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसात ती जागा खाली करायचे होते मात्र ती न केल्याने आज त्यांच्यावर सिडकोने कारवाई केलेली आहे. – विशाल डांगे, अतिक्रमण निर्मूलन विभाग अधिकारी