
पैठणमधील मुख्य डाव्या कालव्यावरील चारीचे पाणी फळबागात, पिकांत घुसले. यामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वडीगोद्री उप विभागांतर्गत डाव्या कालव्यावरील चाऱ्या ( वितरीका ) क्रमांक 14 ते 22 अशा कालव्याच्या 9 वितरिका आहेत. या 9 वितरिकांच्या प्रत्येकी 3 ते 4 उप वितरिका आहेत. या सर्व वितरिका व उप वितरिकाद्वारे सुमारे 8 हजार हेक्टर पिकांना पाणी मिळते. सध्या डाव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांना सिंचनसाठी पाणी दिले जात आहे. यासाठी चाऱ्यांची उपचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य चाऱ्यांची दुरुस्ती कधी-कधी होते. मात्र ती थातुरमातुर बिले काढण्यासाठी होऊन दोन ते तीन महिन्यांत चाऱ्यांची अवस्था जशासतशी होऊन जाते. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना श्रमदानातून दुरुस्ती करावी लागते. पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपचाऱ्यांकडे लक्षही देत नाहीत. शेतकरीच पिकांना पाणी देण्यासाठी स्वतः खर्च करून पाणी देतात.
चारी क्रमांक 18-वर संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत पाणी सोडताना शेतकऱ्यांचे नुकसान कोणी पाहत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिकात पाणी साचते. या चारीला कालव्यातून पाणी सोडताना चारीची क्षमता किंवा चारीत पाण्याची क्षमता किती आहे. याचा कुठल्याही अंदाज न घेता पाणी सोडून चारी ओव्हर फ्लो होते. वडीगोद्री येथील शेतकरी ज्ञानेश्वर भीमराव आटोळे मोसंबीच्या बागामध्ये चारीचे पाणी पाणीच साचून तळ्याचे स्वरुप आल्याने मोसंबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नेहमीप्रमाणे मोसंबीचे आणि फळबागांचे नुकसान होत असल्यामुळे जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली असता त्यांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. अधिकारी दखल घेत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी स्वतः जाऊन चारीचे पाणी बंद केले. अधिकाऱ्यांच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी ज्ञानेश्वर आटोळे व या चारीखालील शेतकऱ्यांचे चारीच्या पाण्याने जे नुकसान झाले त्याच्या पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.