रायगडचे मच्छीमार होणार हायटेक; ताजेपणा, चव आणि निर्जंतुकपणा टिकणार

रायगडचे मच्छीमार बांधव आता हायटेक होणार आहेत. रस्त्यावर किंवा ओट्यांवर सुकी मासळी सुकवली जात होती. ही पारंपरिक पद्धत बंद होणार असून आता सौर वाळवणी यंत्राद्वारे सुकी मासळी सुकवली जाणार आहे. हायटेक यंत्रामुळे मासळीचा ताजेपणा, चव आणि निर्जंतुकपणा टिकणार आहे.

माकळी सुकवण्यासाठी कोकणातील मच्छीमार अद्याप आधुनिक यंत्राचा वापर करीत नाहीत. ही मासळी रस्त्यावर किंवा खास बांधलेल्या ओट्यांवर सुकवली जाते. यावेळी त्यावर माशा बसतात. अनेक वेळा त्यात माती, खडे मिसळले जातात. यामुळे सुकी मासळी आरोग्यदायी नसते असे कारण ग्राहक देतात. सुक्या मासळीला अपेक्षित दरही मिळत नाही. यावर उपाय म्हणून मासळी सुकवण्यासाठी आता सौरऊर्जेवर चालणाऱ्या यंत्राचा वापर केला जाणार असून याचे प्रात्यक्षिक नुकतेच अलिबाग येथे जिल्हा रोजगार कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात मच्छीमारांना दाखवण्यात आले.

सुक्या मासळीचे अर्थकारण लक्षात घेता येथील मच्छीमार बांधवांना मासळी वाळवण्यासाठी यंत्रे पुरवण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. हे यंत्र वापरण्यास अगदी सोपे असून त्यातून मासळीचा ताजेपणा, चव आणि निर्जंतुकपणा टिकवला जाणार आहे. त्यामुळे मासळी सुकवताना येणारे अडथळे दूर होऊन ग्राहकांना आरोग्यदायी सुकी मासळी उपलब्ध होणार आहे.

सेंच्युरियन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंटमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या गटाने राज्यातील किनारी गावांमध्ये मच्छीमारांसाठी पर्यावरणपूरक सौर कोरडे यंत्र तयार केले आहे. कोकणातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक रूप देण्यासाठी सौर वाळवणी यंत्र ही सुरुवात ठरेल. हे यंत्र घेण्यास इच्छुक असणाऱ्या मच्छीमारांना अर्थसहाय्य देण्यात येईल.