असमाधानकारक; न्यूलॅण्ड्सच्या खेळपट्टीवर आयसीसीने ओढले ताशेरे

न्यूलॅण्ड्सवरचा कसोटी सामना दीड दिवसात संपल्यावर कर्णधार रोहित शर्माने खेळपट्टीला अक्षरशः सोलून काढले होते आणि हाच सामना हिंदुस्थानात असता तर वादांची स्पर्धाच सुरू झाली असती, पण आता आयसीसीनेही ही खेळपट्टी असमाधानकारक असल्याचे ताशेरे ओढले आहेत.

आयसीसी काय म्हणाली
न्यूलॅण्ड्सच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड होते. पूर्ण सामन्यादरम्यान चेंडू वेगात आणि कधी कधी धोकादायकरीत्या उसळले, त्यामुळे शॉट्स मारणे कठीण होऊन बसले होते. काही फलंदाजांच्या ग्लोव्हजवरही चेंडू लागला. अनियमित उसळण्यामुळे काही विकेटसुद्धा पडले.

खेळपट्टीवर आयसीसीचे लक्ष असते
आयसीसी खेळपट्टी आणि आऊटफिल्डच्या गुणवत्तेबाबत सदैव जागरूक असते. जर सामनाधिकाऱयांनी खेळपट्टीला खराब ठरवले तर त्या खेळपट्टीला निकृष्ट दर्जाचे गुण दिले जाते. या अवगुणामुळे पाच वर्षांच्या काळात त्या खेळपट्टीला पाच किंवा त्यापेक्षा अधिक निकृष्ट दर्जाबाबत गुण दिले गेल्यास त्या मैदानावर निलंबन लादले जाते. त्यामुळे खेळपट्टीबाबत क्रिकेट संघटनाही उत्कृष्ट दर्जा राखण्याचा प्रयत्न करत असते.

रोहित काय म्हणाला होता…
न्यूलॅण्ड्सची खेळपट्टी कशी होती ती आम्ही पाहिली. अशा खेळपट्टीवर खेळण्यात मला कोणतीही अडचण नाही. जोपर्यंत हिंदुस्थानात प्रत्येक जण आपले तोंड बंद ठेवेल आणि हिंदुस्थानच्या खेळपट्टय़ांबाबत जास्त बोलणार नाही. कारण कसोटीत तुम्ही स्वतःला आव्हान देण्यासाठी आलेले असता. हे धोकादायक होते आणि आव्हानात्मकही. जेव्हा आमच्यासमोर असे आव्हान उभे ठाकते तेव्हा तुम्ही येता आणि त्याचा सामना करता. हिंदुस्थानातही असेच घडते, परंतु हिंदुस्थानातील खेळपट्टय़ांवर चेंडू पहिल्याच दिवशी फिरायला लागल्यास लोपं खेळपट्टीचा आखाडा, धुळीचा धुरळा याबाबत बोलायला सुरुवात करतात. न्यूलॅण्ड्सच्या खेळपट्टीवर खूप भेगा होत्या, परंतु कुणी त्याकडे लक्षच देत नव्हता.