
अडीचशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेला मोखाड्यातील जगदंबेचा बोहाडा (उत्सव) सुरू झाला आहे. गणरायाचे पूजन आणि धूमधडाक्यात निघालेल्या मिरवणुकीने या बोहाड्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून त्यात सर्व जातीधर्मातील भाविक सहभागी झाले आहेत. देव-देवतांचे मुखवटे घालून संबळाच्या तालावर टेंभ्याच्या प्रकाशात नाचणारी सोंगे हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. धार्मिक, सामाजिक एकतेचे प्रतीक यानिमित्ताने दर्शवण्यात आले असून बोहाडा आठ दिवस चालणार आहे.
धुलीवंदनापासून सुरू झालेल्या बोहाडा उत्सवात रावणाची मिरवणूक काढण्यात येते. ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. या मिरवणुकीत संबळाचे ताफे सज्ज असतात. संबळाच्या तालावर स्थानिक कलाकार नृत्य सादर करतात. या मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जगदंबा मंदिरासमोरील मंडपामध्ये गणपतीचे विधीवत पूजन केले असून या बोहाडा उत्सवात आदिवासींची पारंपरिक देवता, रामायण, महाभारत, रामविजय, विष्णू पुराण, पांडव प्रताप या धार्मिक ग्रंथातील देवतांची उत्सवासाठी प्रतिकात्मक निवड केली जाते.


























































