संकटात शोधली संधी

>>अश्विन बापट

थालीपीठ भाजणी, कणीक, आंबोळी पीठ; प्रसन्न बाक्रेंची व्यवसाय संकल्पना हिट

संकट किंवा आव्हाने कधी कधी नव्या जगाची दारे खुली करतात असे म्हणतात. दादरच्या प्रसन्न बाव्रेंचा प्रवास जाणून घेताना नेमक्या याच वाक्याचा प्रत्यय आला. सिव्हिल डिझायनर ते विविध पीठांचे उत्पादक व्हाया कोरोना काळ ही त्यांची वाटचाल बरेच काही सांगून जाणारी आहे.

प्रसाद बाव्रे म्हणाले, मी 22 वर्षे सिव्हिल डिझायनर म्हणून काम केलेय. दुबई, मस्कत, कोरिया सगळीकडे जाऊन काम केलेय. मग 2017 ला मायदेशी परत आलो, तेव्हा इथे आर्थिकदृष्टय़ा काहीसे आव्हानात्मक वातावरण होते. तेव्हा माझी पत्नी प्राजक्ताने मला हा खाद्यपदार्थ निर्मितीचा पर्याय सुचवला. मला पदार्थांसंबंधी, जेवण करण्यासंबंधी आधीपासूनच विशेष आवड होती. त्या आवडीला अधिक गांभीर्याने घेतले आणि सुरू झाला बाव्रे फूड्सचा प्रवास. माझे पहिले उत्पादन थालीपीठ भाजणी. मैत्रिणीच्या हॉटेलमध्ये ती भाजणी विक्रीसाठी पाठवली. चांगला प्रतिसादही मिळाला. पुढे काळाच्या ओघात दुसरा जॉबही मिळाला, तेव्हाही साइड बाय साइड पीठ उत्पादन सुरूच होते. अशी दुहेरी कसरत मी 2018 ते 2021 पर्यंत तीन वर्षे केली. ऑफिसमध्ये असताना भाजणीसाठी पह्न यायचा. मग घरी येऊन भाजणी बनवून ती

ऑर्डर पोहोचवेपर्यंत रात्रीचे अकरा वाजत असत. पुढे मागणी वाढत गेली, व्याप वाढत गेला. या काळात पत्नीने दिलेले पाठबळ फार मोलाचे होते.

कोरोना काळात पीठ निर्मितीमध्ये मी पाय रोवण्यास सुरुवात केली. 2022 मध्ये मागणी जशी आणखी वाढली तशी दादरमध्ये जागा भाडय़ाने घेतली. तिथे उत्पादन सुरू केले. पुढच्या दोन वर्षांत हा व्यवसाय आणखी फुलला. आता थालीपीठ भाजणीसह उपवासाची भाजणी, आंबोळी पीठ, चकली भाजणी, मालवणी वडा पीठ, पोळीसाठीची कणीक अशा सुमारे 16 उत्पादनांची भर त्यात पडली. माझे सर्वाधिक विक्री होणारे उत्पादन म्हणजे थालीपीठ भाजणी आणि गव्हाची कणीक. आता मी प्रायव्हेट लिमिटेड पंपनी स्थापन करून माझ्या या व्यवसायाला अधिक शिस्तबद्ध रूप दिलेय.

महिन्याला एक हजार किलो पीठ विक्रीचे लक्ष्य आहे आणि ते गाठले जाते. मुंबई. पुणे, बंगळुरू येथे त्यांची उत्पादने पोहोचली आहेत. अमेरिकेतही त्यांचे ग्राहक आहेत.

आताच्या सोशल मीडियाच्या काळात डिजिटल मार्पेटिंगसाठीही पावले टाकण्याचा माझा प्रयत्न आहे. माझी प्रॉडक्ट रेंज आणखी विस्तारण्याच्या दृष्टीने त्यात आप्पे पीठासारखे उत्पादन वाढवायचेय. माझ्या उत्पादनांची 16 च्या घरात असलेली संख्या मला 25 च्या घरात न्यायचीय. आपल्या उत्पादनांची परदेशात निर्यात व्हावी, हे आपले स्वप्न असल्याचेही प्रसन्न यांनी अधोरेखित करून सांगितले.

(लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)