महापालिकेची शाळा खासगी संस्थेला चालवायला दिली

विधानसभेत लोढा आणि अस्लम शेख यांच्यात खडाजंगी मालवणी येथील महापालिकेची शाळा खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याच्या प्रश्नावरून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्यात आज विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. शेख यांनी महापालिकेची शाळा ताब्यात घेण्याचा आणि आपल्याला धमकावल्याचा आरोप लोढा यांनी केला, तर टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी शेख यांनी केली.

अस्लम शेख यांनी मुंबई महापालिका शाळांचे खासगीकरण करण्याच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुंबई महापालिकेच्या पीपीपी तत्त्वावर मालवणीमधील शाळा प्रयास या संस्थेला चालवायला दिली नाही तर संस्थेने फक्त नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक नेमले आहेत. त्यामुळे दहावीच्या निकालात सुधारणा झाल्याचे सांगितले. ही चर्चा सुरू असताना मंत्री मंगलप्रभात लोढा उभे राहिले आणि त्यांनी शेख यांना उद्देशून मालवणीची शाळा फझलानी ट्रस्टकडे ठेवण्यामागे हेतू काय आहे? शाळेत पालकांनी आंदोलन केले तेव्हा आपण पालकमंत्री या नात्याने शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतल्याची माहिती दिली. त्यावेळी शेख यांनी माझ्याशिवाय येथे कुणी येऊ शकत नाही. येथे सरकार चालणार नाही तर फक्त अस्लम शेख चालेल, अशी भाषा केल्याचा आरोप लोढा यांनी केला.

संस्थेने नियुक्त केलेले शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण आहेत की माहीत नाही. त्यामुळे हे शिक्षक जर टीईटी उत्तीर्ण नसतील तर त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी अस्लम शेख यांनी केली. यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन व टीईटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असून जो न्याय अन्य संस्थांना लागू होईल तोच न्याय फझलानी ट्रस्टला लागू होईल असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी सांगितल्यावर वाद मिटला.