672 बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर, मिठी नदीचे पात्र 100 मीटर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिठी नदी रुंदीकरणात अडथळा ठरणाऱया तब्बल 672 बांधकामांवर पालिकेने गेल्या दोन दिवसांत बुलडोझर फिरवला आहे. पालिकच्या ‘एच/पूर्व’ वांद्रे पूर्व विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे नदीलगतचा 500 मीटर परिसर मोकळा झाला असून मिठी नदीच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मिठी नदीच्या पात्राची रुंदी आता 40 मीटरवरून 100 मीटर होणार आहे. शिवाय मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अन्यत्र वळवल्यामुळे नदी प्रदूषणाला आळा बसणार आहे. मिठी नदीतील सांडपाण्याचा प्रवाह योग्य करणे आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने पालिकेच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मिठी नदीच्या पात्रात किंवा पात्रालगत अनधिकृतपणे झालेली बांधकामे निष्कासित करण्यासाठी एच पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या देखरेखीत ही कार्यवाही करण्यात आली.