ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ओळख, धमकी अन् अल्पवयीन मुलीचे नग्न फोटो थेट कुटुंबियांच्या व्हॉटसअपवर

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली असून एका अल्पवयीन मुलीचे नग्न फोटो तिच्याच कुटुंबीयांना व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ऑनलाईन गेमची आवड असणाऱ्या अल्पवयीन मिनाक्षीला (बदलेल नाव) ‘फ्री फायर’ खेळणं चांगलंच महागात पडलं आहे. ‘फ्री फायर’ या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ती आशिषच्या (बदलेलं नाव) संपर्कात आली. सतत गेम खेळत असल्यामुळे त्यांची हळूहळू मैत्री झाली आणि दोघांनी व्हॉट्सअप नंबरची अदलाबदलही केली. दोघांमध्ये संवाद सुरू होता.

जून-जुलैच्या दरम्यान आशिषने मिनाक्षीच्या भोळेपणाचा फायदा घेतं तिला धमकी दिली. ‘जर तू तूझे न्यूड फोटो मला पाठवले नाहीस तर, मी तुझ्या बहिणचं काही तरी बर-वाईट करेन’, अशी धमकी आरोपीने दिली. यामुळे घाबरलेल्या मिनाक्षीने भितीपोटी न्यूड फोटो आरोपीला पाठवले. यानंतर आरोपीने या फोटोंचा फायदा उठवत मिनाक्षीला शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली.

यामुळे घाबरलेल्या मिनाक्षीने त्याच्याशी संपर्क तोडला. ऑनलाईन गेम खेळणेही बंद केले. याचा राग आल्याने आरोपीने दिवाळीच्या काळात मिनाक्षीचे न्यूड फोटो तिच्या वडिलांना आणि आजीला पाठवले. हे फोटो पाहून त्यांनाही धक्का बसला. कुटुंबियांनी मुलीशी संवाद साधला. कुटुंबियांचा आधार मिळाल्यानंतर मिनाक्षीने सर्व प्रकार सांगितला आणि त्यांनंतर त्यांनी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला.

आरोपी आणि पीडिता नेहमी फोनवर संवाद साधत होते. आम्ही या प्रकरणाचा तपास सुरु केला असून आरोपीवर कलम 354, 354 (डी), माहिती तंत्रज्ञान कायद्याची कलमे आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.