मी माझा जीव देईन, पण बंगालचे विभाजन कदापि होऊ देणार नाही, ममता बॅनर्जींनी भाजपला ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील सत्तेच्या जोरावर भाजपच्या काही नेत्यांकडून बंगालचे विभाजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अखंड बंगालसाठी मी माझा जीव देईन, गरज पडल्यास आम्ही आमचं रक्त सांडायला तयार आहोत, पण राज्याचे विभाजन कदापि होऊ देणार नाही, अशा शब्दांत वेगळय़ा राज्याची मागणी करणाऱया भाजपला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठणकावले.

भाजपच्या काही नेत्यांनी पश्चिम बंगालचे विभाजन करून वेगळे राज्य करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 2024 च्या लोकसभा निकडणुकीपूर्वी राज्यात ‘अलिप्ततावाद’ वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

उत्तर बंगालमध्ये सर्व समुदायांचे लोक अनेक दशकांपासून एकत्र राहत आहेत, परंतु भाजप लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप कधी गोरखा लँडची मागणी करत आहे, तर कधी वेगळय़ा उत्तर बंगालची मागणी करत आहे. गरज पडल्यास मी माझे रक्त सांडायला तयार आहे, पण राज्याचे विभाजन कधीच होऊ देणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी ठणकावून सांगितले.

तुम्ही मला धमकावू शकता, माझ्या छातीवर बंदूक ठेवू शकता आणि तरीही मी अखंड बंगालसाठी लढत राहीन.
– ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री