
बांधकाम पूर्ण होऊनही दोन महिन्यांहून अधिक काळ बंद ठेवण्यात आलेल्या मसूरच्या रेल्वे उड्डाणपुलाचे अखेर स्थानिक लोकांनीच लोकार्पण केले. दैनिक ‘सामना’ने या विषयाला वाचा फोडल्यानंतर जनतेत धुमसत असलेला असंतोष उफाळून आला व त्यांनी पुलाचे उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला केला.
मल्हार पेठ ते पंढरपूर राज्य महामार्गावरील मसूर रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे लाईनवरील उड्डाणपुलासंदर्भातील बातमी ‘मल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरील उड्डाणपुलाचे उद्घाटन रखडले’ या शीर्षकाखाली आजच्या दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध केली. वास्तविक या पुलाच्या कामामुळे मागील दोन वर्षे वाहनधारकांना अनंत यातनांना सामोरे जावे लागले. प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे की राजकीय श्रेयवादामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे रेल्वे फाटकावर वाहतूककोंडी नित्याचीच होती. तसेच दुर्घटनांमध्ये वाढ झाली होती, त्यामुळे लोकांना फार त्रास सहन करावा लागत होता.
आता पूल तयार होऊनदेखील वाहनधारकांची त्रासातून सुटका न झाल्यामुळे जनतेमध्ये असंतोष वाढत होता. आज मसूर येथील सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच कांबिरवाडी, कवठे, कोणेगाव, खराडे, वाण्याची वाडी, हणबरवाडी येथील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ या सर्वांनी मिळून आज उड्डाणपुलाचे लोकार्पण करून करून तो वाहतुकीसाठी खुला केला.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व सातारा जि.प.चे माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सातारा जिल्हा बँकेचे संचालक लहूराज जाधव, सह्याद्री कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, सुनील पाटील, कोणेगावचे सरपंच रमेश चव्हाण, कांबिरवाडीचे सरपंच महेंद्र बोले, वाण्याच्या वाडीचे माजी सरपंच प्रदीप मोरे, खराडे येथील शरद बर्गे, मसूरचे उपसरपंच विजयसिंह जगदाळे, प्रा. कादर पिरजादे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शहाजीराजे जगदाळे, माजी सरपंच प्रकाश माळी, दिनकर शिरतोडे, ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, प्रमोद चव्हाण, महेश घाटगे, सिकंदर शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत पाटील, जमीर मुल्ला, बापूसाहेब जगदाळे, हिमांशू शहा, जितेंद्र निकम तसेच विविध गावांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



























































