
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला वाटते की, लोकशाहीवरील हल्ल्यांवर जनतेने गप्प राहावे. त्यांना संपूर्ण देशाला काही व्यावसायिकांच्या हातात विकायचे आहे, अशी कडाडून टीका काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.
कोची येथे काँग्रेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आरएसएस आणि भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, संविधान वाचवण्यासाठी पंचायती आणि नगरपालिकांना बळकट करणे आवश्यक आहे. 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती काँग्रेस पक्षाने केली होती. काँग्रेसने यातून पंचायती, जिल्हा आणि राज्य शासनांना बळकट केले. संविधान वाचवणे म्हणजे सत्ता आणि निर्णयांचा हक्क नागरिकांपर्यंत पोहोचवणे. मात्र, आज भाजप आणि आरएसएस सत्तेचे केंद्रीकरण करू इच्छितात, तर काँग्रेस विकेंद्रीकरणावर विश्वास ठेवते. तत्पूर्वी, राहुल गांधींनी कलामासेरी येथे डॉ. एम. लीलावती यांना केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचा प्रियदर्शिनी साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित केले.
विचारासाठी संघर्ष करणारेच मोठे होतात
राहुल गांधी म्हणाले, कोणताही देश गप्प राहिल्यास तो कधीही महान होऊ शकत नाही. गप्प राहण्याच्या संस्कृतीत लोभी प्रवृत्ती लपलेली असते. लोक आणि देश आपले विचार आणि मते मोकळेपणाने मांडतात आणि त्यासाठी संघर्ष करतात, तेच देश आणि लोक महान होतात.



























































