द्राक्ष बाग गेली, कांदे गेले आता मुलांच्या फीसाठीही पैसे उरले नाहीत; येवल्यातील शेतकरी महिलांनी व्यक्त केल्या भावना

राज्यात जून ते सप्टेंबर या मान्सून पावसाच्या काळात पावसानं मारलेली दडी आणि आता झालेला अवकाळी पाऊस यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याचा सर्वाधिक फटका उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बसला असून नाशिक आणि आजूबाजूच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आणि कांदा पिकाला फटका बसला असल्याचं पाहायला मिळत आहे.

विरोधक आक्रमक झाल्यानंतर मंत्र्यांनी आता आपापल्या भागातील बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान येवल्यातील दोन शेतकरी महिलांनी एबीपी माझासोबत संवाद साधला. यावेळी ‘आमच्या मुलांनी एवढं कर्ज काढून टँकरच्या पाण्यातून ही द्राक्ष बाग उभी केली. त्यात आता काही उरलं नाही, 10 एकर कांदे लावले होते तेही गेले. पूर्ण वर्षांचं पीक गेलं’, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

‘आता आमच्याकडे मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी देखील पैसे नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. आमचं नुकसान झालं आहे, काही करा कुणीही करा पण आम्हाला नुकसान भरपाई द्या’, अशी मागणी या महिलांनी यावेळी केली.