
तालुक्यातील नारायणडोह येथे 11 एकर जागेवर नव्याने साकारले जात असलेल्या वर्ग -1 च्या कारागृहाच्या कामाला गती मिळाली आहे. 2013 मध्ये तत्कालीन कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर काळे यांच्या कार्यकालात या नवीन कारागृहाला मंजुरी मिळाली होती. मध्यंतरी मात्र हे काम ठप्प होते. आता काळे बदली होऊन पुन्हा नगरला आल्याने त्यांनी हे काम पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या कामाच्या प्राथमिक प्रक्रिया काही महिन्यांतच पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे. शहरातील जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर ही भव्यदिव्य वास्तू साकारली जाणार आहे.
बादशहा औरंगजेबच्या कार्यकाळातील सबजेल या वास्तूचे 1890 सालापासून कारागृहात रूपांतर झाले. 35 गुंठय़ांच्या जागेत असलेल्या सबजेल कारागृहात बंदीवान व कारागृह अधिकारी, कर्मचाऱयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्ञानेश्वर काळे यांनी पूर्वी कार्यरत असताना नवीन बराक बांधून बंदिवानांची क्षमता 49 वरून 69 पर्यंत केली. मात्र, आजही तशीच परिस्थिती असून, महिला बंदीवानांसाठी जागा नसल्याने त्यांना पुणे कारागृहात पाठवावे लागत आहे. बंदीवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सुविधा पुरविणे व जागेच्या मोठय़ा अडचणीचा सामना करावा लागत असल्याने या कारागृहाचे रुपांतर प्रशस्त जागेत होण्यासाठी कारागृह अधीक्षक काळे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून नारायणडोह येथील वर्ग-1 चे कारागृह उभारण्यासाठी 3 जुलै 2013 मध्ये मंजुरी मिळवली होती. त्यांची बदली झाल्यानंतर नवीन कारागृहाच्या कामाकडे कोणीही पाठपुरावा न केल्याने हे काम रेंगाळले.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 7 फेब्रुवारी 2018 रोजी या कामाला मंजुरी देऊन तब्बल 956.83 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, पाठपुरावा नसल्याने या कामाला चालना मिळाली नाही. जून 2022 मध्ये पुन्हा नगर जिल्हा कारागृह अधीक्षकपदी ज्ञानेश्वर काळे बदलून आले असून, आपल्या हातून राहिलेले अर्धवट काम पूर्णत्वाला घेऊन जाण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. त्या उद्देशाने त्यांनी या कामाला गती देण्यास सुरुवात केली आहे.
नारायणडोह कारागृहाच्या प्रस्तावित कामासाठी प्राथमिक अडचणी सोडविण्यात आल्या असून, जागेची मोजणी, एन. ए. यासारखी प्रक्रिया पूर्णत्वाकडे गेली आहे. लवकरच अद्ययावत कारागृह उभारणीचे काम सुरू होणार आहे. या कामासाठी अपर पोलीस महासंचालक पुणे (कारागृह) रितेश कुमार व डीआयजी, पुणे स्वाती साठे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तीन महिन्यांनंतर सेवानिवृत्त होत असल्याने आपल्या कर्मभूमीत मोठे प्रकल्प पूर्णत्वाला नेल्याचे समाधान आयुष्यात राहणार आहे.
– ज्ञानेश्वर काळे, अधीक्षक, नगर कारागृह.
सध्याच्या नगर जिल्हा कारागृहाची स्थिती
35 गुंठे जागेतील कारागृहात 69 बंदीवानांची क्षमता आहे. तर, 16 कर्मचाऱयांची राहण्याची व्यवस्था आहे. 1 हौदामागे 25 बंदीवानांची अंघोळीची क्षमता असते. मात्र, जागा नसल्याने सर्व बंदीवान अंघोळीसाठी एकच हौद वापरत आहेत. कार्यक्रम, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कोणतीही विशेष जागा नाही. महिला बंदीवानांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
नारायणडोह येथील प्रस्तावित कारागृहाची वैशिष्टय़े
नगर तालुक्यातील नारायणडोह 11 एकर जागेवर प्रशस्त व अद्ययावत कारागृह उभे राहत आहे. यामध्ये बंदीवानांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारागृहात 500 बंदीवानांसाठी नियमावलीप्रमाणे कारागृह आणि 125 कर्मचाऱयांच्या वसाहतीचे सर्व सोयींनी युक्त बांधकाम केले जाणार आहे. नवीन कारागृहात बंदिस्त व मैदानी खेळाचे मैदान, व्यायामाची व्यवस्था, सांस्कृतिक हॉल, विशेष मुलाखत कक्ष, ओपीडी आदी सुविधांचा समावेश आहे. स्वतंत्र्य महिला बंदीवानांचा विभाग, अतिसुरक्षा विभाग यांचा समावेश राहणार आहे.

























































