आवश्यक सुधारणा केल्यास हिंदुस्थानचा विकासदर 7 टक्क्यांपर्यंत जाईल – जागतिक बँक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या महामारीनंतर आवश्यक त्या सुधारणा केल्यास हिंदुस्थानचा विकासदर 7 टक्क्यांपर्यंत पोहचेल, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. हा विकासदर गाठण्यासाठी हिंदुस्थानला आरोग्य, श्रम, भूमी, कौशल्य विकास आणि आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा कराव्या लागतील, असे बँकेने म्हटले आहे. देशातील उत्पादकता, खासगी गुतंवणूक आणि निर्यात वाढेल, अशा सुधारणांची गरज बँकेने व्यक्त केली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करत आर्थिक सुधारणांना गती देण्याचे काम सरकार आरबीआयच्या मदतीने करत आहे.

कोरोनाच्या जागतिक संकटानंतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आहे. संधी आणि निराशा असे चित्र जागतिक अर्थव्यवस्थेत दिसत आहे. त्यामुळे योग्य त्या सुधारणा केल्यास हिंदुस्थानला विकासाच्या चांगल्या संधी असल्याचे जागतिक बँकेचे हिंदुस्थानातील प्रमुख जुनैद अहमद यांनी सांगितले. पायाभूत सुविधा,श्रम, भूमी यासारख्या क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यावर भर देणे आणि जागतिक मूल्य साखळीशी राष्ट्रीय योजनांची सांगड घालणे महत्त्वाचे आहे. याकडे लक्ष देणारे देश कोरोना संकटावर लवकर मात करून विकास करतील असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे हिंदुस्थानला या बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. तसेच सबसिडी, कर्ज, राजस्व वसूल, महसूली तूट भरणे, नवे कर्जवाटप यासारख्या आर्थिक गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याची गरजही जागतिक बँकेने व्यक्त केली आहे.

हिंदुस्थानने या कोरोनाच्या संकटाचे संधीत रुपांतर करण्याची गरज बायोकॉन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक किरण मजूमदार शॉ यांनी व्यक्त केली. कौशल्य विकासावर भर देत जागतिक मूल्य साखळीत देशाचे महत्त्वाचे स्थान निर्माण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. हिंदुस्थानात माहिती तंत्रज्ञान, एनालिटिक्स,डेटा विज्ञान, इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे ज्ञान मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रलियन डॉलरपर्यंत नेण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी हिंदुस्थानने स्टार्टअपवर भर देण्याची गरज इंटेल इंडियाच्या हिंदुस्थानातील प्रमुख निवरुती राय यांनी व्यक्त केली.