ऑनलाईन गेम खेळू नको सांगितले; रागाच्या भरात तरुणाने चाव्या, चाकू आणि नेलकटर गिळले

बिहारमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेली तरुणाई काय करेल याचा नेम नाही. अशीच एक विचित्र घटना मोतिहारी येथे उघडकीस आली आहे. ऑनलाईन गेम खेळायला पालकांनी नकार दिल्याने एका महाविद्यालयीन तरुणाने चक्क चाव्या, चाकू, नेल कटर गिळला. तरूणावर यशस्वी शस्त्रक्रिया करून पोटातून सर्व वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत. तरुणाची प्रकृती आता स्थिर आहे.

बिहारमधील मोतिहारी येथे ऑनलाईन गेमवरुन महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाचा पालकांशी वाद झाला. पालकांनी तरुणाला ऑनलाईन गेम खेळण्यास नकार दिला. यामुळे तरुण संतापला आणि रागाच्या भरात नको ते करुन बसला. तरुणाने चक्क चाव्या, चाकू आणि नेलकटर गिळले.

काही तासानंतर तरुणाची प्रकृती बिघडली. घरच्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करत पोटाचा एक्स रे काढला. एक्स रे मध्ये त्याने गिळलेल्या सर्व वस्तू दिसून आल्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची शस्त्रक्रिया केली. दीड तासाच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाच्या पोटातील चाव्या, चाकू आणि नेल कटर डॉक्टरांनी बाहेर काढले.

तरुणाची प्रकृती आता स्थिर असून धोका टळला आहे. तरुणाला बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया गेम खेळण्यास मनाई केल्याने तरुणाने धक्कादायक कृत्य केले.