
लॉकडाऊनमुळे तब्बल चार महिने थिएटर बंद आहेत. अनलॉक 2 मध्ये केंद्र सरकारने थिएटर आणि जिम सुरू करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे अनलॉक 3 मध्ये तरी आपल्यावर केंद्र सरकारची कृपादृष्टी होईल, या आशेवर थिएटरमालक आहेत. पडदा पुन्हा उघडणार पण पूर्ण खबरदारी घेऊनच. मात्र प्रेक्षकांच्या स्वागताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल सिनेमा हॉलमध्ये केले जात आहे.
कोरोनाचा फटका इतर उद्योगधंद्यांप्रमाणे मनोरंजनसृष्टीला देखील मोठय़ा प्रमाणात बसला आहे. अनलॉक फेजमध्ये हळूहळू जनजीवन सुरळीत होत असून चित्रपट आणि मालिकांच्या शुटींग सुरुवात झाली आहे. त्यामुळे ‘अनलॉक 3’ कडून थिएटर मालकांना खूप आशा आहेत. लॉकडाऊनमुळे थिएटरमालकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक बडे चित्रपट ओटीटीकडे गेले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना सुरक्षित वाटेल असे वातावरण थिएटरमध्ये निर्माण करून प्रेक्षकांना आपल्याकडे वळवण्याचे मोठे आवाहन थिएटरमालकांपुढे असणार आहे. प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना सिनेमा हॉलमध्ये केल्या जात असून सध्यातरी तिकिटांचे आणि खाद्यपदार्थांचे दर स्थिर राहतील, अशी माहिती आहे.
…तरच प्रेक्षकांना मिळणार एन्ट्री!
यापुढे थिएटरमध्ये जाताना प्रेक्षकांनाही काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. मास्कशिवाय एन्ट्री मिळणार नाही. आरोग्य सेतू ऍप बंधनकारक असेल. प्रेक्षकांमध्ये अंतर राखले जावे यासाठी काही खुर्च्या रिकाम्या ठेवल्या जातील. दोन शोमध्ये 30 ते 40 मिनिटांचा गॅप असणार आहे.
मसाला चहा आणि दूध मिळणार!
कोल्ड्रिंक्स, फ्लेवर्ड पॉपकॉर्न असतीलच मात्र सगळे मेन्यू सिंगल युज ग्लास आणि लिफाफ्यात प्रेक्षकांना मिळतील. फूड कोर्टमध्ये स्वच्छता आणि निर्जंतूकीकरणाला प्राधान्य दिले जाईल. मसाला चहा, इम्युनिटी बूस्टर ड्रिंक, गरम दूध अशा मेन्यूचा नव्याने समावेश होण्याची शक्यता आहे.
प्रेक्षकांना थिएटरमध्ये सुरक्षित वाटावे यासाठी मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार कॅशलेस, टचलेस, पेपरलेस आणि रिस्कलेस व्यवस्था असणार आहे. मुख्य गेटवर सॅनीटायझर, थर्मल स्क्रिनिंग अशा व्यवस्था असतील. तिकिटेदेखील पेपरलेस असतील. शिवाय पीपीई कीट देखील खरेदीसाठी उपलब्ध असतील.
– आलोक टंडन, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयनॉक्स


























































