कोल्हार येथे चोरी व सराफाची लूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोल्हार

कोल्हार येथे सराफाचे बंद दुकान फोडून तीन अज्ञात चोरट्यांनी दोन किलो चांदीचे दागिने तर शुक्रवारच्या भर आठवडे बाजारात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी पाच तोळे सोन्याचे गंठण लांबविल्याची घटना घडली. दोन्ही घटनेत एकूण सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास झाला आहे.

कोल्हार ग्रामपंचायत जवळ असलेल्या सोमनाथ निवृत्ती अडाणी यांच्या संजीवनी ज्वेलर्स या दुकानांचे कुलूप तोडून तीन अज्ञात चोरट्यांनी प्रथम दुकानातील दोन सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. आपला चेहेरा स्पष्ट दिसू नये याकरिता या तिघांनी तोंडाला स्कार्फ बांधलेला होता. दुकानात असलेले चांदीचे सुमारे दोन किलो दागदागिने चोरट्यांनी लंपास केले. सकाळी दुकानाचे मालक सोमनाथ अडाणी आल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली. दरम्यान लोणी पोलीस स्टेशनमचे सपोनि प्रवीण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. मात्र श्वान परिसरातच घुटमळले. दुपारी शिर्डीचे एसीपी वाघचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. त्यानंतर लोणी पोलिसांनी पथक तयार करून या घटनेचा तपास सुरू केला.

दुसऱ्या घटनेत कोल्हार येथे शुक्रवारच्या आठवडे बाजारात भर दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील 5 तोळ्यांचे गंठण ओरबाडून धूम ठोकल्याची घटना घडली. सदर घटना आठवडे बाजाराच्या गर्दीत घडल्याने महिला वर्गात खळबळ उडाली आहे

काल कोल्हार येथे शुक्रवारचा आठवडे बाजार होता यावेळी सिन्नर येथील स्वाती संदीप पोटे ही महिला भगवती मातेच्या दर्शनासाठी आपल्या कुटुंब समवेत चार चाकी गाडीतून अली होती गाडीतून उतरताच अवघ्या 10 फुटांवर काळ्या विना नंबरच्या दुचाकी वरून आलेल्या दोघांनी एका झटक्यात सदर महिलेच्या गळ्यातील 5 तोळ्यांचे सोन्याचे गंठन लांबविले यावेळी बाजारात असलेल्या नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला मात्र तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या या दोन चोरट्यांनी एवढ्या गर्दीत सुसाट वेगाने मोटारसायकल दामटत नगर मनमाड रस्त्याने धूम ठोकली .

भगवतीमाता मंदिरालागत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात व सारफच्या दुकानातील कॅमेऱ्यात सदर घटना कैद झाली आहे मात्र चोरट्यांनी काल घडलेल्या दोन्ही घटनेतील पाचही चोरट्यांनी तोंडाला स्कार्फ बांधलेला असल्याने या दोन्ही घटनेच्या तपासाचे लोणी पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. याबाबत सोमनाथ अडाणी व स्वाती पोटे यांनी लोणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे . सदर घटनेचा तपास भय्यासाहेब देशमुख व सपोनि प्रवीण पाटील करीत आहेत. एकाच दिवशी चोरट्यांनी दोन्ही घटनेत एकूण सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज लांबविल्याने कोल्हार मध्ये खळबळ उडाली आहे.