श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात सोमवारी (दि.12) रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देवाचे सुमारे 50 किलो अंदाजे 30 लाख रुपयांचे चांदीचे सिंहासन चोरुन नेले.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार पारगाव सुद्रिक येथील ग्रामदैवत श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिराचा सोमवारी (दि.12) रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजा कटवणीच्या सहाय्याने तोडून मंदिरात प्रवेश करत मंदिरातील सुद्रिकेश्वर महाराजांचे सुमारे 50 किलो वजनाचे अंदाजे 30 लाख रुपयांचे चांदीचे सिंहासन नेले. या घटनेचे चित्रीकरण मंदिरात असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनेची माहिती पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा येथील प्रसिध्द व्यापारी कुटुंबासह दर्शनासाठी आले असताना त्यांना दरवाज्याचा कडी कोंडा तुटलेला असल्याचे दिसून आले. त्यांनी मंदिराचे पुजारी प्रवीण रमेश धुमाळ यांना घडलेल्या घटनेची माहिती फोन करून दिली. पुजारी धुमाळ यांनी मंदिराकडे धाव घेत मंदिरात जाऊन पाहिल्यावर मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिस ठाण्यात देत गावकऱ्यांना गोळा केले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी मंदिरात धाव घेत पाहणी केली. घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पुढील तपासासाठी श्वान पथक, अंगुली मुद्रा तज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. तसेच घटनास्थळी नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे, पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी धाव घेत परिसरातील सीसीटिव्ही तपासात तांत्रिक माहिती संकलन करत तपास सुरू केला असून आरोपी लवकरच जेरबंद होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात चोरी झाल्याची माहिती ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत निषेध सभा घेतली. या सभेमध्ये ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगत चोरट्यांचा शोध तत्काळ घेऊन आरोपींना अटक करावी अशी एकमुखी मागणी केली.