अकरावीच्या विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्च-एप्रिलमध्ये दहावीच्या परीक्षा होऊन पाच महिने उलटले तरी बऱयाच कॉलेजमध्ये अकरावीचे 100 टक्के प्रवेश झालेले नाहीत. त्यातच 21 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्टीला सुरुवात होणार असून त्याआधी अकरावीच्या प्रथम सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांच्या हातात फक्त 25 ते 28 दिवसच शिल्लक आहेत. प्रवेशप्रक्रियाच पूर्ण न झाल्याने अभ्यासक्रमाविषयी शिक्षण उपसंचालक कार्यालयातून कॉलेजना कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे कॉलेजस्तरावरच अकरावीच्या अभ्यासाचे नियोजन सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रथम सत्राचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे अनेक कॉलेजमध्ये सहामाही परीक्षा होणार नाही. शिल्लक असलेल्या दिवसात जो अभ्यासक्रम पूर्ण होईल त्याआधारे चाचणी परीक्षा घेण्याचे कॉलेजनी ठरविले आहे. तर काही ठिकाणी दिवाळी सुट्टीनंतर सहामाही परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे. सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रोजेक्ट, जरनल, असाईनमेंटच्या आधारे परीक्षा घेण्याचे नियोजन कॉलेजनी सुरू केले आहे.

दक्षिण मुंबईतील विल्सन कॉलेजचे अकरावीचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत. तर विलेपार्ले येथील एन.एम. कॉलेजचे 7 सप्टेंबरपासून सुरू झाले आहेत. या कॉलेजमध्ये अकरावीचे 90 टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. साठये कॉलेजही येत्या 15 तारखेपासून सुरू होणार असून या कॉलेजमध्ये 90 ते 93 टक्के प्रवेश झाले आहेत. ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे कोषाध्यक्ष हेमंत शिंदे यांनी सांगितले, अकरावीचे वर्ग सुरू करणे तसेच अभ्यासक्रमाबाबत कोणत्याही सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून कॉलेजना मिळालेल्या नाहीत. गेल्यावर्षीदेखील अशा सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे कॉलेजच अभ्यासक्रम आणि परीक्षा यांचे नियोजन करतात. अद्याप प्रवेशप्रक्रियाच सुरू असल्याने कॉलेजनी सहामाही परीक्षा घेण्याचा विचारच केलेला नसल्याचेही शिंदे म्हणाले.

अकरावीच्या आणखी एका प्रवेशफेरीची शक्यता

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पुढे आणखी एक प्रवेशफेरी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तीन नियमित फेऱया, एक विशेष फेरी झाली असून सध्या दुसऱया विशेष फेरीची प्रक्रिया सुरू आहे. या फेरीनंतर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन आणखी एका फेरीचे नियोजन करण्याची गरज आहे का हे ठरविले जाईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले.

अकरावीत शिकविण्याची सुरुवात उशिराने होते. त्यामुळे दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा घेणे कठीण आहे. चाचणी परीक्षेसारखी एकच परीक्षा घेणे शक्य आहे. दहावीच्या परीक्षेनंतर चार-पाच महिन्यांनी विद्यार्थी पुन्हा अभ्यासाला लागतात. त्यामुळे त्यांना लिखाणाची सवय नसते. त्यामुळे आम्ही असाईनमेंट देण्याची पद्धत सुरू केली आहे.

डॉ. एम. आर. राजवाडे,  प्राचार्य, साठये महाविद्यालय

मुंबई विभागातील आतापर्यंतच्या प्रवेशाची स्थिती (कोटा आणि ऑनलाइन)

एकूण कॉलेज – 1015

प्रवेशक्षमता – 3,71,475

एकूण विद्यार्थी – 2,99,687

प्रवेश घेतले – 2,23,399

रिक्त जागा – 1,48,076

प्रवेश न घेतलेले – 76,288

सध्या फेरपरीक्षा उत्तीर्ण आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. मुंबईतील नामवंत कॉलेजमध्ये याआधीच 90 ते 95 टक्के प्रवेश झाले आहेत. या कॉलेजना वर्ग सुरू करण्यासंबंधी शिक्षण विभागाकडून सूचना मिळणे आवश्यक होते. बऱयाच कॉलेजनी शिक्षण विभागाच्या सूचनांची वाट न पाहता अकरावीचे वर्ग सुरू केले आहेत.

टी. ए. शिवारे, अध्यक्ष, नॉन गव्हर्मेंट कॉलेज प्रिंसिपल असोसिएशन