
विदर्भ, मराठवाडय़ासह उत्तर महाराष्ट्र आणि केंद्रशासित मुंबई असे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा भाजपचा डाव आहे. हा डाव यशस्वी करण्यासाठीच त्यांनी शिवसेनेत फूट पाडल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज केला.
दहिसर येथे आज झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदार आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला. विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस यांनी हा मेळावा आयोजित केला होता.
आपल्यावर आणि आपल्या कुटुंबीयांवर ईडीने कारवाई केली, राहते घर आणि वडिलोपार्जित मालमत्ता जप्त केली, पण आपण गुडघे टेकले नाहीत, असे खासदार राऊत म्हणाले.
महाराष्ट्र आणि ठाकरे कुटुंबीयांविरुद्ध फार मोठे कारस्थान शिजतेय, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. महाराष्ट्राचे तुकडे करण्याला शिवसेना प्राणपणाने विरोध करेल म्हणूनच भाजपला शिवसेना खतम करायची आहे. पण बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना विरोधकांना पुरून उरेल, असे खासदार राऊत म्हणाले.
भाजपवाले आम्हाला पाहिले की रस्ता बदलतात. कारण त्यांना माहीत आहे की हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. शिवसेनेचा वाघ आहे. याच्या नादाला लागू नका. वेळ पडली तर झेंडा खिशात ठेवून दांडा बाहेर काढेल.’ असा सणसणीत इशाराही खासदार राऊत यांनी दिला.






























































