
मागील काही महिन्यात तुळजापूर तालुक्यातील विहीरी, कुपनलीका, शेत तळे यातील जलसिंचनाचे विद्युत पंप, स्टार्टर, केबल चोरीस जाण्याचे सत्र वाढले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या बारा मोटारीसह चोरट्याला अटक केली आहे. या सर्व पंप चोरीची कार्यपध्दती व कार्यक्षेत्र पाहता पोलीसांच्या लक्षात आले की, बहुतांशी विद्युत पंप हे रात्रीच्या वेळी तुळजापूर, तामलवाडी व नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील गाव शिवारातून चोरीस गेले आहेत. त्या दृष्टीने पोलीसांनी तुळजापूर तालुक्यातील खबऱ्यांना तसेच ग्राम सुरक्षा दलांना सतर्क करुन जुने जलसिंचन पंप विक्री करणारा कोणी तालुक्यात आहे काय ? याची माहिती घेण्यास सांगितले.
पोलीसांच्या प्रयत्नांना यश येत खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील खडकी तांडा येथील कैलास गोपाळ चव्हाण (49) हा गेल्या काही महिन्यांपासुन जुन्या जलसिंचन पंपांचा विक्री व्यवसाय करु लागला असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कैलास चव्हाण याच्यावर पाळत ठेवली. जलसिंचन पंप खरेदी करण्याच्या बहान्याने अनेक बनावट शेतकरी ग्राहक कैलास चव्हाण याच्याकडे पोलिसांनी पाठवले असता पोलीसांची खात्री झाली की तो स्वस्त दरात चोरीचे जलसिंचन पंप विकण्याच्या प्रयत्नात आहे.
यावरुन पथकाने मंगळवारी त्यास राहत्या घरुन ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात 12 जलसिंचन पंप आढळले. या पंपाच्या ताब्याविषयी तो समाधानकारक माहिती देत नसल्याने पोलीसांनी गुन्हे अभिलेख तपासले असता निदर्शनास आले की नमूद 12 पंप हे तुळजापूर तालुक्यातून चोरी केलेले असून त्यावरुन तामलवाडी पोलीस ठाण्यात 9, नळदुर्ग पोलिस ठाण्यात 2, तुळजापूर पोलिस ठाण्यात 1 असे एकुण 12 गुन्हे दाखल आहेत. यावरुन पथकाने त्यास नमूद 12 पंप व चोरी करण्यास वापरलेली मोटारसायकलसह ताब्यात घेतली आहे. पोलीस पथकाने केलेल्या या यशस्वी कामगीरीबद्दल पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन व अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



























































