कुर्ला रेल्वे स्थानकात मोबाईल चोराला पकडले

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात ट्रेन सुरू होताच एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱया सराईत मोबाईल चोराला पकडण्यात रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) पोलिसाला शुक्रवारी यश आले. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानकातून प्रवाशांचे मोबाईल हिसकावण्याचे, चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवाशांच्या वस्तू आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक-4हून सीएसएमटीकडे जाणारी 2.59च्या लोकलमध्ये ही घटना घडली. सराईत आरोपीने चेंबूरमधील रहिवाशी असलेल्या प्रवाशाच्या खिशात हात घातला व मोबाईल हिसकावून पळ काढला. आरोपीने धावत्या ट्रेनमधून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु डय़ुटीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) पोलिसाने जिवाची पर्वा न करता तसेच क्षणाचाही विलंब न लावता आरोपीचा पाठलाग करून पकडले. अब्दूल हमीद शामद अन्सारी (24) असे आरोपीचे नाव असून तो गोवंडीतील बैंगणवाडीतील रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 379, 147 याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.