चोरटय़ाने कुरिअरचे 45 पार्सल्स लांबवले, वर्सोवा येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका कुरिअर कंपनीचे 45 पार्सल्स चोरट्याने लांबवल्याची घटना वर्सोवा गावात घडली आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस चोरटय़ाचा शोध घेत आहेत. अंधेरी येथे तरुण राहत असून तो एका कुरिअर कंपनीत काम करतो. गेल्या आठवडय़ात तरुणाने डिलिव्हरीसाठी 111 पार्सल्स घेतले होते.

पार्सल्स जास्त आल्याने त्याने ते पार्सल एका चहा विक्रेत्याकडे ठेवले होते. 98 पार्सल्स घेऊन तो डिलिव्हरीसाठी गेला. दुपारपर्यंत त्याने 52 पार्सल्सची डिलिव्हरी केली होती. सायंकाळी तो वर्सोवा गावातील सिल्वा पाखाडी येथे आला. मोटरसायकलवरून तो काही पार्सल्स घेऊन डिलिव्हरीसाठी जात होता. काही वेळाने तो त्याच्या मोटरसायकलजवळ आला. तेव्हा त्याच्या बॅगेत 45 पार्सल्स नव्हते. त्याने त्या पार्सलचा शोध घेतला. पार्सल चोरीला गेल्याची माहिती त्याने त्याच्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर त्याने वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडल्या प्रकाराची माहिती वर्सोवा पोलिसांना दिली. तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.