
पुणे शहरातील विविध भागात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या 10 मोटारींच्या काचा फोडून कारटेप लांबविण्याची घटना नुकतीच घडली आहे. बाणेर रस्ता, सेनापती बापट रस्ता तसेच येरवडा भागात मोटारींच्या काचा फोडून कारटेप चोरण्यात आल्या आहेत. संदेश जैन (वय 38, रा.सकाळनगर, बाणेर) यांनी याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
जैन यांनी बाणेर रस्त्यावर मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडून 69 हजार रुपयांचा कारटेप लांबविला. तसेच सेनापती बापट रस्त्यावर दोन मोटारींची काच फोडून कारटेप लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास तांदळे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. येरवडा भागातील लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्याालय परिसरात टेम्पोची काच फोडून तीन हजार रुपयांचा टेप लांबविण्यात आला. चोरट्यांनी या भागातील एका मोटारीची काच फोडून कारटेप चोरीचा प्रयत्न केला. याबाबत टेम्पोचालक संजय विठ्ठलराव कोते (वय 31, रा. सुभाषनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस नाईक सुनील माळेकर याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


























































