
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर तूर्त कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले. मात्र, 24 तासांच्या आत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने आज कागल येथील मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली. तब्बल साडेनऊ तास कुटुंबीयांची चौकशी केली. यामुळे उद्वेग झालेल्या हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने किती त्रास देणार? आता आम्हाला गोळय़ा घाला, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर दोन महिन्यांत तिसऱ्यांदा धाड पडली आहे. 11 जानेवारीला कागल आणि पुण्यातील कोंढवा येथील नातेवाईकांच्या घरावर छापा टाकला होता. आज सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे दहा ते बारा अधिकारी मोठा फौजफाटा घेऊन कागल येथील मुश्रीफ यांच्या घरी धडकले. सीआरपीएफचे 35 जवान, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. साडेनऊ तासानंतर सायंकाळी साडेचार वाजता ‘ईडी’चे अधिकारी घराबाहेर पडले.
प्रचंड गर्दी; संताप
मुंबईत विधिमंडळ अधिवेशनासाठी गेलेले हसन मुश्रीफ आज कागल येथे परतणार होते. त्यामुळे नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नागरिक त्यांच्या निवासस्थानाकडे जाण्यास निघाले. मात्र, ‘ईडी’ने धाड टाकल्याचे वृत्त समजताच खळबळ उडाली. गैबी चौक आणि मुश्रीफ यांच्या घराबाहेर मोठी गर्दी उसळली. कारवाईवेळी घरामध्ये मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा, दोन मुले आबिद आणि नाविद, सुना, नातवंडे होती. पोलिसांकडून कोणालाही घराबाहेर जाण्यास मज्जाव केला होता. मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा घराच्या गेटजवळ आल्या आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना संतप्त भावना व्यक्त केल्या. ‘ईडी’कडून कुटुंबियांना नाहक त्रास दिला जात आहे. आणखी किती त्रास देणार आहात? त्यांना (ईडी) सांगा आम्हाला गोळ्या घाला आणि जावा, असे सायरा मुश्रीफ यांनी म्हटले.
फडणवीस म्हणाले मला माहीत नाही
नगर दौऱयावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘ईडी’ने हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा धाड टाकली याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मला काही माहीत नाही. माध्यमांमधूनच मला समजले.
मोदी सरकार हाय हाय
‘ईडी’च्या छाप्याने कागलमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आणि नागरिकांनी मुश्रीफ यांच्या घराकडे धाव घेतली आणि ठिय्या आंदोलन केला. मोदी सरकार हाय हाय, भाजप, किरिट सोमय्या यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.































































