कोरोनाची तिसरी लाट; केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना, सावध व्हा! परिस्थिती भयंकर होऊ शकते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सध्या 5 ते 10 टक्के कोरोना  रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत आहे. मात्र, येत्या काळात काहीही सांगता येत नाही. कधीही परिस्थिती बदलून भयंकर होऊ शकते. त्यामुळे सावध रहा, असा गंभीर इशारा केंद्र सरकारने दिला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत करावयाच्या उपाययोजनांबाबत केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना दिल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भात सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 20 ते 23 टक्के ऍक्टिव्ह रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता होती. सध्या रुग्णवाढीचा वेग खूप जास्त असला तरी 5 ते 10 टक्के ऍक्टिव्ह रुग्णांनाच हॉस्पिटलायझेशनची गरज दिसत आहे. ही स्थिती असली तरी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. सध्याची परिस्थिती कधीही बदलू शकते, असे या पत्रात म्हटले आहे.

रुग्णांकडून होणाऱ्या अतिरिक्त वसुलीवर ‘वॉच’

रुग्णांकडून घेतले गेलेले पैसे न्याय्य आहेत का? अतिरिक्त वसुली तर हॉस्पिटलकडून होत नाही ना? यावर ‘वॉच’ ठेवण्याची सूचना केंद्राने केली आहेत. यासाठी निरीक्षण आणि कारवाईकरिता यंत्रणा उभी करावी, असे म्हटले आहे.

काय आहेत सूचना

कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंटबरोबरच ओमायक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय व्यवस्थेवर ताण पडत आहे.

एकूण ऍक्टिव्ह रुग्णसंख्या, हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्ण, होम आयसोलेशनमधील रुग्णसंख्या याचा दररोज बारकाईने आढावा घ्यावा. ऑक्सिजन बेडची स्थिती, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर सपोर्ट याकडे लक्ष द्यावे. या यंत्रणेत काही सुधारणा करण्याची गरज असल्यास त्या कराव्यात.

कोविड सेंटर्स आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णांची ये-जा करण्यासाठी अतिरिक्त ऍम्ब्यूलन्स उपलब्ध करून द्याव्यात. तसेचे खासगी वाहनांचा वापर करावा.

सध्या आरोग्य यंत्रणेवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी, इंटर्न, सीनिअर रेसिडेंट्स, ज्युनिअर रेसिडेंट्, बीएससी नर्सिंगचे विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी मदत घ्यावी. टेलि कन्सल्टेशनसाठी सेवानिवृत्त डॉक्टर्स, एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती करावी.