
पाळीव श्वान आज शहरी भागात घरातील एक सदस्य बनला आहे. रस्त्यांवर फिरणाऱया मोकाट श्वानांच्या नशिबी सतत हाडहाड असते. तिरुवनंतपुरम येथील मनियन पिल्लई हे 70 वर्षीय आजोबा मात्र गेल्या तब्बल 20 वर्षांपासून भटक्या श्वानांचा सांभाळ करत आहेत. नोकरी नाही, स्वत:चे घर नाही तरीही ते जवळपास डझनभर श्वानांची भूक भागवत आहेत.
पृथ्वीवर मानवाचा जितका अधिकार आहे तितकाच मुक्या प्राण्यांचा देखील आहे, असे मनियन यांचे म्हणणे आहे. त्याच भावनेतून ते मुक्या श्वानांचा सांभाळ करतात. दररोज संध्याकाळी त्यांना खायला घालतात. मनियन यांना बघताच श्वान त्यांच्याभोवती गर्दी करतात. मनियन यांनी 10 वर्षे सैन्यदलात काम केले.
त्यानंतर त्यांनी स्वत:हून नोकरी सोडली. आता ते मजुरी करतायत. लॉकडाऊनमध्ये त्यांना मोठा आर्थिक फटका बसला त्यात राहते घरही गेले. सध्या एका मित्राच्या दुकानात ते राहतात. मजुरी करून पैसे मिळतात त्यातील काही रक्कम ते भुकेल्या श्वानांवर खर्च करतात. त्यांच्या या अनोख्या श्वानप्रेमाचे काहीजण काैतुक तर काहीजण टीका करतात.






























































