आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्याचे सोलार रिक्षातून देशभ्रमण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पवई येथील आयआयटी मुंबईतील सुशील रेड्डी या माजी विद्यार्थ्याने पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी जनजागृतीची कास त्याने धरली आहे. सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा घेऊन त्याचे देशभ्रमण सुरू आहे. मुंबईसह दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता अशा चार महानगरांमध्ये तो पर्यावरण आणि सौरऊर्जेबाबत जनजागृती करत आहे.

वातावरण बदलाचे पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. इंधनांवर चालणार्‍या वाहनांमधून वातावरणात विषारी वायू सोडले जातात. ते पर्यावरणासाठीच नव्हे तर माणसाच्या आरोग्यासाठीही घातक ठरत आहेत. सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे हा त्यावर रामबाण उपाय असल्याचा संदेश 30 वर्षीय सुशील देत आहे. सौरऊर्जा ही महागडी आहे असा समाजात गैरसमज आहे. तो गैरसमज दूर करून समाजात सौरऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करणे हा आपल्या देशभ्रमणामागचा मूळ हेतू असल्याचे सुशील सांगतो.

25 मेपासून सुरू झालेला त्याचा प्रवास 26 जुलैपर्यंत चालणार आहे. आतापर्यंत त्याने साडेतीन हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. 2016 मध्ये सौरऊर्जेवरील इलेक्ट्रिक सायकलवरून जास्तीत जास्त प्रवास केल्याचा गिनीज विक्रमही त्याच्या नावावर आहे.

ताशी 55 किलोमीटरचा वेग असलेली त्याची सौररिक्षा 600 किलो वजन वाहून नेण्यास सक्षम आहे.  बंगळुरूतील कंपनीच्या सहकार्याने त्याने ही सौररिक्षा बनवून घेतली. सोलार पॅनेल्स  रिक्षाच्या छतावर आहेत. पॅनेल्स आणि बॅटरी यांमधील व्होल्टेज नियंत्रित ठेवण्याचीही व्यवस्था त्याच्या रिक्षामध्ये आहे.