मराठय़ांना त्रास देणाऱ्यांना विधानसभेला पाडणार; जरांगे यांचा मिंधे सरकारला थेट इशारा

माझ्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. राज्य सरकारकडून आमच्या मागण्यांबाबत अद्याप कोणताही चर्चेचा प्रस्ताव आलेला नाही. कोणती विचारपूसही केलेली नाही. सरकार जेवढा विलंब करेल तेवढा विधानसभेला त्यांना त्रास होईल.

 लोकसभा निवडणुकीत मी कुणाला पाडा म्हणालो नाही आणि कुणाला विजयी करा, असेही म्हणालो नाही. मराठा समाजाने त्याच्या विवेकाने मतदानाचा निर्णय घेतला. परंतु आता माझ्यावर जातीयवाद केल्याचे खापर फोडण्यात येत आहे. मी मराठय़ांना वारंवार शांत राहण्याचे आवाहन करतोय, पण यांचे नेते परदेशात मजा करताहेत! असा जोरदार हल्ला मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केला. बीडमध्ये मराठा समाजावर भयंकर अत्याचार होत असल्याचा आरोप करतानाच मराठा समाजाला त्रास देणाऱ्यांना विधानसभेला पाडणार, असा इशारा जरांगे यांनी मिंधे सरकारला आज दिला.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी नरेंद्र मोदी सरकारला शुभेच्छा देतानाच हे सरकार गोरगरिबांसाठी काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

बीडमधील तणाव गृहमंत्र्यांनी कमी करावा

बीडमध्ये मराठा समाजावर अत्याचार सुरू आहे. बीड, माजलगाव, केज, गेवराई येथे मराठा तरुणांना विनाकारण मारहाण करण्यात आली. महाजनवाडीत मराठा कार्यकर्त्यांवर तलवारी चालवण्यात आल्या. मराठा समाजाने शांतता राखावी असे आवाहन मी वारंवार करतोय, पण समोरून असे आवाहन करण्यात आल्याचे मला दिसत नाही. त्यामुळे त्यांना समाजात शांतता नको आहे असे दिसते. शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस अधीक्षकांची असल्याचे जरांगे यांनी बजावून सांगितले.

मराठा समाज शांत आहे पण याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत असा कुणीही काढू नये. मराठा समाजाला जे त्रास देतील त्यांना आम्ही विधानसभेत इंगा दाखवणार आणि असा दाखवणार की यांच्या पाच पिढय़ा पुन्हा राजकारणात उभ्या राहणार नाहीत. परळीतही आम्ही हेच करू, असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले. मराठा समाज आता यांच्या जत्रेत सहभागी होणार नाही तर यांना पाडण्यासाठी मतदानाला जाणार असेही ते म्हणाले.

मी नेकनूरला दर्ग्यात चादर चढवली

माझ्याबद्दल अनेक अपप्रचार करण्यात येत आहेत. मी नेकनूरला दर्ग्यात चादर चढवली. मी कट्टर हिंदू आहे. मला हिंदू धर्माचा अभिमान आहे. मुस्लिमांनाही त्यांच्या धर्माचा अभिमान असावा. त्यात गैर काही नाही. पण मी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवल्याचा खोटा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. हे अत्यंत चुकीचे आहे, असे जरांगे यांनी म्हटले.