
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील आनंद ईलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट यांच्या दुकानात चोरट्यांनी चोरी करुन त्यांचा खून केला होता आणि फरार झाले होते. आरोपींचा शोध चिखली पोलिसांनी लावला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्याची पुढील चौकशी सुरू आहे. याबाबत पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पत्रकार परिषदेत पोलिसांनी माहिती दिली की, चिखली पोलीस ठाण्यात 17 नोव्हेंबर रोजी तक्रारदार मनन कमलेश पोपट ( वय 27, रा. चिखली) यांनी तोंडी तक्रार दिली की, 16 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता तक्रारदारांचे वडील कमलेश डायालाल पोपट (वय 61) हे त्यांचे आनंद इलेक्ट्रॉनिक्स दुकानमध्ये दुकानचे लहान शटर अर्धे उघडे ठेवत हिशोब करीत होते. त्यावेळी अनोळखी तीन व्यक्तींनी दुकानात प्रवेश केला. बंदुकीचा दाखवत तलवारीने वार केले आणि तक्रादराच्या वडिलांच्या गळयातील सोन्याची चैन व रोकड 15 ते 20 हजार रुपये चोरुन नेले. चोरी केल्यावर तलवारीने व बंदुकीच्या मुठीने तोंडावर व पोटावर मारहाण करत त्यांची हत्या केली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करुन तपास सुरू होता.
चिखली पोलीस ठाणा येथे गंभीर खुनाचा, जबरी चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला. गुन्ह्याच्या तपासात चिखली पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस यांचे एकूण 7 तपास पथके तयार करण्यात आली. तपास पथकाच्या मदतीने रेकॉर्डवरील गुन्हेगार, गोपनिय बातमीदार, भौगोलीक परिस्थीती व तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करण्यात आला. या अशा पध्दतीचा वापर करुन देऊळगावराजा पोलीस ठाण्यातील गुन्हा 3 नोव्हेंबर रोजी नोंद झाला होता. या दोन गुन्ह्यातील आरोपींच्या वर्णन साम्य असल्याने देऊळगावराजा तपास पथकाने तपास सुरु केला. गोपनिय माहीतीच्या आधारे देऊळगावमही, धोत्रा नंदाई, गावात कोंबीग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यात राहुल किसन जायभाये ( वय 23, रा. देऊळगांवमही, ता. देऊळगांवराजा), राहुल अशोक बनसोडे ( वय 20, रा. धोत्रा नंदई, ता. देऊळगांवराजा), नामदेव पंढरीनाथ बोंगाणे ( वय 20, रा. धोत्रा नंदई, ता. देऊळगांवराजा) यांना 25 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. या आरोपींची कसून चौकशी करण्यात आली.
आरोपी राहुल किसन जायभाये हा सहा महिन्यापुर्वी आनंद इलेक्ट्रॉनिक्स दुकानात होम थिएटर घेण्यासाठी आला होता. होमथिएटरच्या किंमतीवरुन त्यावेळी आरोपी व कमलेश पोपट यांचे वाद झाले होते. कमलेश पोपट याने आरोपीला शिवीगाळ केली होती. या दरम्यान राहुल जायभाये याच्या वडिलांचे एका महीन्यापुर्वी निधन झाले आहे. कमलेश पोपट यांच्यशी झालेल्या वादाचा राग मनात ठेवत त्यांना धडा शिकवण्याचा कट आरोपींनी रचून त्यांची हत्या केली, असे आरोपींनी चौकशीदरम्यान कबूल केले.






























































