सोरतापवाडीत लॉज चालकाकडे मागितली खंडणी; कानकाटे टोळीच्या तिघांना अटक

पुणे शहरातील पुणे सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी परिसरातील लॉज चालकाकडे खंडणीची मागणी करून लॉजची तोडफोड केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गोरख कानकाटे टोळीवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. शुभम उर्फ ददू कानकाटे (वय 24, रा. कोरेगाव, ता. हवेली), अमित डोरले (वय 20, रा. सोरतापवाडी, ता. हवेली), साईराज कानकाटे (वय 19, रा. कोरेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सोरतापवाडी येथील 41 वर्षांय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांचे सोरतापवाडी येथे हॉटेल व लॉज आहे. 26 जुलै रोजी आरोपी डोरले त्याठिकाणी गेला. त्याने तक्रारदार यांना फोन देत बोलण्यास सांगितले. त्यानंतर फोनवरून ददू कानकाटे याने त्यांच्याकडे 50 हजार रूपये हप्ता पाच तारखेपर्यंत द्यावा लागेल, असे सांगितले. तक्रारदार यांनी हप्ता देण्यास नकार दिल्यामुळे दोन दुचाकीवरून आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी हातातील कोयते दाखवत दहशत निर्माण करत लॉजवर दगडफेक केली. तसेच त्यांनी धमकावण्यास सुरुवात केल्यामुळे शेजारील नागरिक पळून गेले. आरोपींनी केलेल्या दगडफेकीमुळे लॉजच्या खिडक्या, दरवाजाचे नुकसान झाले. आम्ही ददू भाईची माणसे आहोत, लॉज चालवायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल, असे म्हणून हातात कोयता फिरवत निघून गेले.

त्यानंतर आरोपींनी 28 जुलैला आरोपी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तक्रारदारांना फोन करून लॉजच्या खाली बोलवून घेतले. त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसविले. धंदा करायचा असेल तर दर महिन्याला 10 हजार रूपये हप्ता द्यावा लागेल, अशी दमदाटी केली. पैसे न दिल्यास तुझा धंदा चालू देणार नाही, अशी धमकीही दिली. तू माझ्या डोक्यात बसू नकोस, मी लय वेडा आहे, मी तुला मारायला घाबरणार नाही, पोलीस माझे काहीही करू शकत नाहीत. तुझ्या शेजारचा लॉजवाला मला महिन्याला दहा हजार रूपये देतो, तुला मस्ती आलीय, तुझी गेम करून टाकीन, अशी आरोपीने धमकी दिली. यानंतर तक्रारदार यांनी लोणीकंद पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार खंडणीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी गुंड गोरख कानकाटे याचा पुतण्या ददूसह तिघांना अटक केली आहे. तर, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या