परदेशात नोकरीचे आमिष दाखवून अनेक बेरोजगारांना लाखो रुपयांचा चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

कॅनडा, यूएसए व यूएई या देशांमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून देणार, अशी फेसबुकवर जाहिरात करून अनेक बेरोजगारांना चांगल्या नोकरीचे आमिष दाखवणारे तसेच परदेशातील उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी करून लाखो रुपयांचा चुना लावणाऱया टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट-11 ने खेळ खल्लास केला आहे.

दामोदरे (नाव बदललेले) हे ज्येष्ठ नागरिक नोकरीच्या शोधात होते. निवृत्तीनंतर आर्थिक अडचणीमुळे ते इंटरनेटवर ऑनलाइन नोकरी मिळते का बघत होते. त्यावेळी ऑगस्ट महिन्यात त्यांच्या फेसबुकवर ‘इंटरनॅशनल जॉब्स फ्री रिक्रूटमेंट’ ही जाहिरात त्यांना दिसली. त्यानंतर दामोदरे यांनी आपली अर्हता व इतर तपशील देऊन नोकरीकरिता ऑनलाइन अर्ज केला. मग जाहिरातकर्त्याने लगेच दामोदरे यांच्याशी संपर्क साधून त्यांचा बायोटाडा व इतर आवश्यक कागदपत्रे व्हॉटस्ऍप व ई-मेलद्वारे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर वेगवेगळय़ा गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून आणि त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर विविध कारणांसाठी दीड लाख रुपये वेगवेगळय़ा बँक खात्यात भरण्यास सांगितले. त्यानुसार 1 लाख 54 हजार दामोदरे यांनी ऑनलाइन डिपॉझिट केले, पण त्यानंतर बरेच दिवस झाले तरी जाहिरातदारांकडून नोकरीबाबत काहीच हालचाल न दिसल्याने त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. पण त्या भामटय़ांनी दामोदरे यांना टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानंतर युनिट-11चे प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव तसेच आनंद रावराणे, अरविंद घाग, रईस शेख, शरद झिने, नितीन उमेळकर, शेषराव शेळके व पथकाने गुह्याचा तपास सुरू केला.

बंगळुरूतून फसवाफसवी

14 ऑक्टोबर रोजी या गुह्यातील अजय गुप्ता (23) या आरोपीला संशयावरून गोरेगाव पश्चिमेकडून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी बंगळुरू येथून ऑनलाइन पद्धतीने जाहिरातीच्या माध्यमातून बेरोजगारांना फसविणाऱया केड्रिक रॉबर्ट (23), विग्नेश सुरेश केसी (22), स्नेहा पंचारिया यांना पकडले. या सर्वांनी गुह्यांची कबुली देत अशा प्रकारे अनेकांना फसविल्याचे चौकशीत सांगितले.